हिंगोली : तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याने वन विभागात नोकरी लावतो म्हणून बेरोजगार युवकांना १ कोटी १६ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर आता एका व्यापाऱ्यालाही १४ लाखांनी फसविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा भांडाफोड झाला होता. तसेच वन विभागात नोकरी लावतो म्हणून बेरोजगार युवकांकडून १ कोटी १६ लाख रूपये उकळल्याचे समोर आले होते. यापूर्वी तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी रात्री तिसरा गुन्हा दाखल झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचे खोटे सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारची रजिस्टर बँक नसताना अन्य दोघांच्या मदतीने फिक्स डिपॉझिट करण्यासाठी १४ लाख २७ हजार ७०० रूपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत व्यापाऱ्याने म्हटले आहे.
याप्रकरणी व्यापारी निलेश बजरंगलाल अग्रवाल (रा. रामकुटी अकोला रोड हिंगोली) यांच्या फिर्यादीवरून अमोल मराठे उर्फ पजई, अनंता कलोरे, अभय भरतीया यांच्याविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे तपास करीत आहेत.