हिंगोली : अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी, पोलीस प्रशासनातर्फे लवकरच आपत्कालीन सेवा सुरू होणार आहे. ११२ नंबर डायल केल्यास दहाव्या मिनिटाला पोलीस हजर होणार आहेत. यासाठी हायटेक यंत्रणा उभारली असून, हिंगोली दलात १४ चारचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत.
कोरोना काळातही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गरजूंना तात्काळ मदत मिळावी म्हणून पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावताना दिसत आहेत. यातून कोरोनाला आळा बसण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांना पोलीस आपलेसे वाटत आहेत. सध्या तरी गुन्हे कमी झाल्याचे दिसत आहेत. मात्र, तरीही हाणामारीच्या घटना, अपघात, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. यात अनेेक वेळा अपघातग्रस्त, पीडित महिला, नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यास वेळ जात होता; परंतु आता पोलीस प्रशासन आखणी गतिमान झाले असून, तात्काळ मदत मिळावी म्हणून हायटेक यंत्रणा उभारली आहे. यासाठी ११२ हा आपत्कालीन क्रमांक सुरू केला आहे. लवकरच ही सेवा सुरू होणार असून, काही वेळातच पोलीस मदतीसाठी उपलब्ध होणार आहेत.
कॉल येताच कळणार लोकेशन
अडचणीत सापडलेल्या नागरिक, पीडितांनी त्यांच्या मोबाइलवरून ११२ हा नंबर डायल केल्यास त्यांच्या मोबाइलवरून सध्या पीडित कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, पोलीस ठाणे हद्दीत आहे, याची माहिती काही क्षणांत उपलब्ध होणार आहे. त्यावरून पोलीस लगेच दाखल होणार असून, मदत करणार आहेत.
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा
- अडचणीत सापडलेल्या कुणालाही पोलीस मदत हवी असल्यास ११२ हा आपत्कालीन नंबर डायल करावा लागणार आहे. या नंबरवरून मदत मागितल्यास जास्तीत जास्त दहा मिनिटांपर्यंत पोलीस पोहोचणार आहेत.
- यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रशिक्षित पोलीस कर्मचारी असणार आहेत. वेळीच मदत मिळणार असल्याने अनुचित घटना टळण्यास मदत होणार आहे.
१४ चारचाकी, ३ दुचाकी
आपत्कालीन परिस्थितीत वेळीच मदत मिळावी यासाठी ११२ क्रमांकाच्या हिंगाेली पोलीस दलास १४ चारचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. ही वाहने पोलीस दलात दाखल झाली असून, त्यात अत्याधुनिक यंत्रणा उभारणीचे काम सुरू आहे, तसेच आणखी तीन दुचाकी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे गरजूंना वेळीच मदत मिळणार आहे.
३०० कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
११२ आपत्कालीन सेवेसाठी सध्या २०० पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात सध्या हे प्रशिक्षण सुरू आहे. कोरोनामुळे सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून आणखी १०० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
फोटो : ४