हिंगोली : १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी व इतर मागण्यांसाठी १४ मार्च रोजी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी घोषणा देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी शासन दरबारी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. यासाठी अनेकवेळा आंदोलनही करण्यात आली. परंतु, शासन मागण्यांकडे गांर्भियाने पाहत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांतून होत आहे. या मागण्यांकडे शासनाचे पुन्हा लक्ष वेधण्याकरीता राज्यस्तरीय संप पुकारण्यात आला असून, या संपात हिंगोली जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यासह सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यासह जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम आदी कर्मचारी संघटनांनी सहभाग नोंदविला.
जिल्ह्यातील जवळपास ६ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.संपकरी कर्मचारी जि.प.बहुविध शाळेच्या मैदानावर एकत्र आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जवाहर रोड, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधीचौक, बसस्थानक, नांदेड नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यादरम्यान ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’,असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आहे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी रामदास कावरखे, व्ही.डी.देशमुख, दिलीप कदम, ज्योती पवार, दिलीप पांढरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, या संपामुळे मात्र शासकीय कार्यालयातील कामे ठप्प झाली आहेत.