या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप आर्जव केली. प्रतिभा पोले, घुगे, समीना शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून आमच्या नातेवाईकांना जागचे ही उठता येत नाही. रोज बाहेरून औषधी आणावी लागते. मग आम्ही नसल्यावर ती कोण आणणार? आम्हाला क्वारंटाईन केले तर त्यांच्याकडे कोण बघणार? असा सवाल केला. मात्र कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने तुम्हालाही कोरोना होईल. तुम्ही चाचणी न करताच बाहेर फिरता त्यामुळे इतरांमध्ये संसर्ग पसरत आहे. त्यामुळेच रुग्ण वाढत आहेत. म्हणून थेट क्वारंटाईनमध्ये जा, आता जास्तीचा स्टाफ नियुक्त केला. तुमच्या रुग्णांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे सांगितले. परंतु यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान होत नव्हते. तरीही नाईलाजाने त्यांनी क्वारंटाईनचा रस्ता धरला.
... तर रुग्णसंख्या अर्ध्यावर येईल
नातेवाईकांच्या गरजेच्या वेळी स्टाफ राहत नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास राहिला नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, आता प्रत्येक शिफ्टमध्ये २० परिचारिका व १० वॉर्डबॉय नेमले आहेत. एका वाॅर्डात किमान तीन कर्मचारी राहतील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी ही काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय आता डॉक्टरही वाढले आहेत. नातेवाईक असले की ते जास्त गडबड करतात. इतर गंभीर रुग्णांची तपासणी सुरू असताना आमच्या रुग्णाकडे चला, असा हट्ट धरतात. यात दोन्हींकडून नुकसान होत आहे. तर नातेवाईक रुग्ण शेजारी असला की आमचा स्टाफही त्याकडे वारंवार पाहत नाही. आपल्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचे समजतो. मात्र आता स्टाफने प्रत्येकावर २४ तास चांगले लक्ष ठेवले पाहिजे, अशा कडक सूचना दिल्या. रोज ४ राऊंड बंधनकारक केले. यात एक फिजिशियनचा राहणार आहे.
खाजगी रुग्णालयात रुग्ण अत्यावस्थ होतोय
अनेक रुग्ण आधी खासगी रुग्णालयात अथवा इतर जिल्ह्यात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातही खासगी रुग्णालयात अधिक प्रकृती बिघडलेले रुग्ण नंतर येथे येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना वाचविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातील काही जगत आहेत तर काहींना धोका होत आहे. त्यामुळे रुग्णांनी ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य निर्णय घेऊन योग्य ठिकाणी दाखल झाले पाहिजे. अन्यथा आम्हीही काही करू शकत नाही, असेही जयवंशी म्हणाले.
आता ७० टक्के अत्यावस्थ रुग्ण येताहेत
पूर्वी १० ते १२ टक्के अत्यावस्थ रुग्ण शासकीय रुग्ण संस्थेत यायचे. आता ६० ते ७० टक्के रुग्ण अत्यावस्थ झाल्यावरच या रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे एवढे दिवस वाया का घालवले जात आहेत, हे कळायला मार्ग नाही. वेळेत तपासणी व उपचारामुळे हे टाळणे शक्य आहे. बेड उपलब्ध नसताना इतर जिल्ह्यांत जाऊन आलेले किंवा इतर जिल्ह्याचेच येथे येणारे रुग्ण अत्यावस्थ राहात असून ते वेळेत न आल्याने दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.