लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.शेवाळा येथे काँग्रेस व शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांचा वाद आहे. त्यामुळे या दोन गटांत कायम कुरबूर सुरू असते. दोन्ही गट राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने विकास कामांतही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हस्तक्षेप सुरू असतो. मात्र आतापर्यंत चालत आलेल्या या वादाला आता वरच्या स्तरावर फारसे महत्त्व नव्हते.काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांच्या स्वीयसहायकावर झालेल्या हल्ल्यानंतर जि.प.त अचानक राजकीय धुमश्चक्री सुरु झाली. गावातील वाद वरच्या स्तरापर्यंत पोहोचला.कधी नव्हे, ते आ.टारफे यावेळी आक्रमकपणे समोर आले. त्यांनी या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणी लावून धरली होती. शिवाय त्यांच्या स्वीयसहायकाने यात गुन्हाही दाखल केला. त्यामुळे शिवसेनेचे कळमनुरीचे पं.स. उपसभापती गोपू पाटील व इतरांची नावे यात आली. तर दुसरीकडे गावातील वादाच्या प्रकरणामुळे याच गावच्या असलेल्या जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनीही जातीवाचक शिवीगाळ व धमकावल्याचा गुन्हा आमदाराचे स्वीयसहायक श्रीनिवास नितनवरे, अभय सावंत आदींवर दाखल केला. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणावरून वातावरण तापलेलेच आहे. काल दोन्ही बाजूंनी निषेधाची निवेदनेही आली. आज पुन्हा जि.प. अध्यक्षांना शिवीगाळ करणाºयांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नंदू खिल्लारे, प्रकाश नरवाडे यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटले.दरम्यान, जि.प.तील या वादावरून राजकारणाचा स्तर घसरत चालल्याच्या प्रतिक्रिया देत अनेकांनी हा विषय थांबण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.बैठक : सदस्यांची मते जाणून घेतलीयाबाबत आज आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या दालनात घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना या दोघांनीही सावध भूमिका घेतली. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तर यापुढे असे प्रकार घडूच नयेत, असा बंदोबस्त केला जाईल, असेही ते म्हणाले. तर ही माहिती माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतरच सांगितली जाईल, असेही म्हणाले.जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपची भूमिका काय असेल असे विचारले असता आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सध्या तरी वेट अॅण्ड वॉच हीच भूमिका असल्याचे सांगितले.
जि.प.त अजूनही वातावरण गरमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:09 AM