लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे स्मार्टग्राम योजनेतील प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून पडून आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अर्धशासकीय पत्र दिल्यानंतरही या गावांची दुस-या पंचायत समितीमार्फत करायची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे.जि.प.च्या पंचायत विभागामार्फत स्मार्ट ग्राम योजनेसाठी पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव घेण्यास सांगण्यात आले होते. याअंतर्गत प्रस्तावही सादर झाले आहेत. या ग्रामपंचायतींनी स्वयंमूल्यमापन केलेले असल्याने त्याची तपासणी करण्यासाठी एका पं.स.अंतर्गतची गावे दुसºया पं.स.कडून तपासण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी दिला होता. त्याची तपासणी करण्याचा आदेश दिल्यानंतरही अजून एकाही पंचायत समितीने अशी तपासणी केली की नाही, याचा कोणताच अहवाल दिलेला नाही. सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींपैकी २५ टक्के ग्रा.पं.चीच तपासणी करायची आहे. यात जास्त गुण असलेल्या ग्रा.पं.चीच तपासणी करायची आहे. त्यामुळे अशी तपासणी झाल्याशिवाय पुढील बक्षिसे मिळणार नाहीत.प्रत्येक तालुक्यातून एक व याशिवाय जिल्हा स्तरावरील एक अशा सहा ग्रामपंचायतींची निवड यातून होणार आहे. यात तालुका स्तरावर प्रथम आलेल्या ग्रा.पं.ला १0 लाख रुपये तर जिल्हा स्तरावरील ग्रा.पं.ला ४0 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या योजनेतील रक्कम गावाच्या विविध विकासाच्या कामांसाठी खर्च करता येणार आहे. मात्र अजून गावांची तपासणीच अंतिम होत नसल्याचे चित्र आहे.
स्मार्टग्रामची तपासणीच होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:42 AM