महानिरीक्षकांच्या मोहिमेतही पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हातचलाखी करीत काही ठरावीक गुंडांना हातच लावला नाही. आता ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अशांना सावध करून काही दिवस आवरते घेण्याचे संदेश गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कदाचित महानिरीक्षकांमार्फत बाहेरच्या जिल्ह्यातील पथकांमार्फत छापे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास जिल्हा पोलीस दलावर नामुष्की ओढवण्याची भीती आहे. त्यामुळे तसे न होता स्थानिकलाच किरकोळ कारवाया दाखवून पुन्हा ही मोहीम गतिमान असल्याचे दाखविण्याचाही प्रयत्न आहे. वसमत, औंढा, कुरुंदा, सेनगाव, कनेरगाव नाका, औंढा आणि आखाडा बाळापूर या पट्ट्यातही काही जणांना मिळणारे कायमचे अभय अजूनही कायम आहे. महानिरीक्षकांनी पथकेच पाठवायची तर या भागात पाठवणे गरजेचे आहे. पोलीस दल पूर्वी खबरींचा उपयोग गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी करायचे. आता खबरींचा नवा अवतार समोर येत आहे. हे खबरीच आता पोलीस कधी येणार, याची टीप देत असतात. शिवाय तरीही ते ठाण्यातील काहींच्या जवळचे असतात. चार-दोन ठिकाणची माहिती दिल्यानंतर पक्का खबरी समजून जो सोबत मिरवतोय, तोच अवैध धंदा चालविणाऱ्यांचा खबरी बनल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. यावरही काहीजण धकवून नेत आहेत. तर काही ठिकाणी स्थागुशाची मंडळीच नियमित हजेरी लावून येत असल्याने कारवाईचा चमत्कार घडत नाही. मात्र यातून नवगुन्हेगारांचा उदय होत असून हिंगोलीसारख्या ठिकाणी भरचौकात चाकूने भोसकण्याचे किंवा वसमतला दरमहा एक-दोन मुडदे पाडण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबविण्यासाठी आता सुपरमॅन अवतरणार की स्थानिक पोलीसच या अवैध धंद्यांची खुडणी करण्याऐवजी मुळासकट उपटून काढणार? हा प्रश्न आहे.
...तर महानिरीक्षकांची दरमहा मोहीम हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:18 AM