लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाण्याच्या समस्येवर रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. नगरपालिका येथे पाणीपुरवठा करण्यास तयार आहे. केवळ पाणी साठवण्याची व्यवस्था करा, असे सांगून उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी याबाबत ठराव मांडला.जिल्हा रुग्णालयातील पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता हा मुद्दा चव्हाण यांनी रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत मांडला. तर या समस्येवर उपाय करण्यासाठी पाणी साठवण व्यवस्था तयार केल्यास न.प.कडून पाणीपुरवठ्याची तयारी दर्शविली.यावेळी समिती सदस्य तथा कळमनुरी पं.स. उपसभापती अजय सावंत यांनी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा मुद्दा मांडला. त्यावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांसह वर्ग चारची अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील जागेत सुशोभिकरण करण्याचा ठरावही सदस्यांनी मांडला. तर सामान्य रुग्णालयात अस्ताव्यस्त पार्किंगचा त्रास असून यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यासही सांगितले. तर दर तीन महिन्यांऐवजी दोन महिन्यांनी या समितीची बैठक घ्यावी, असेही सुचविण्यात आले. रुग्णालयातील विविध बाबींवर झालेला २.४६ लाखांचा खर्च तर नियोजित ६.३0 लाखांचा खर्चही यावेळी सादर करण्यात आला.यावेळी डॉ.भगत, डॉ.मंगेश टेहरे, कार्यकारी अभियंता घुबडे, ठाकरे आदींचीही उपस्थिती होती.सामान्य रुग्णालयासह सर्वत्रच औषधींचा तुटवडा असल्याने निविदा प्रक्रियेबाबतही यावेळी सदस्यांनी विचारणा केली. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोर श्रीवास यांनी जि.प.ने या निविदा काढल्या होत्या. त्या उघडण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणांसाठी ५0 लाखांची औषधी खरेदी होणार असल्याचे बैठकीत सांगितले.
सामान्य रुग्णालयाची पाणी समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:50 AM