हिंगोली : कोरोनाचा कहर आता कमी झाल्यामुळे कोविड सेंटरमध्ये नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवाही कमी करण्यात आली असून, याचा फटका जिल्ह्यातील २०० कर्मचाऱ्यांना बसला आहे, तर सध्या ६६ कर्मचारी सेवेत आहेत. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढल्याने दुसऱ्या लाटेत जवळपास २६६ कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. याशिवाय ८० वॉर्ड बॉय, १२० स्वीपरही कंत्राटी पद्धतीने भरले होते. त्यांना दोन महिन्यांपूर्वीच काढले. मात्र, या सर्वांना कोरोनाचा कहर कमी झाला तरीही दोन महिने कामावर ठेवण्यात आले होते. ९ जून २०२१ रोजी आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी जेथे ५० टक्के कोविड कमी झाला तेथील कर्मचारी इतर डेडिकेटेड कोविड सेंटरला हलवून मनुष्यबळ कमी करण्यास आदेशित केले होते, तर येथील केेंद्रात एकही रुग्ण नाही, तेथील सर्व कर्मचारी कमी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हिंगोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात ऐनवेळी मनुष्यबळ मिळत नाही. भरती प्रक्रियेलाही फारसा प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे ऑगस्टपर्यंत हे मनुष्यबळ कायम ठेवण्यात आले होते. शिवाय मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाल्याने काही काळ यावर निर्णय होऊ शकला नाही. आता जवळपास २०० जणांना कमी करण्यात आले आहे. यामध्ये ७७ डॉक्टर, ६७ परिचारिका, ८ तंत्रज्ञ, ३८ आरोग्य सेविकांचा समावेश आहे, तर कामावर ठेवलेल्या ६६ जणांमध्ये ६ डॉक्टर, एक्सरे तंत्रज्ञ ७, परिचारिका १८, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १९, औषध निर्माण अधिकारी २, ऑक्सिजन तंत्रज्ञ ८ यांचा समावेश आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
जेव्हा कोरोनाच्या काळात कुणीही काम करायला तयार नव्हते, तेव्हा आम्ही काम केले. मात्र, आता कोरोनाचा कहर कमी होताच आम्हाला काढून टाकून प्रशासनाने अन्याय केला आहे. इतर भरतीची प्रक्रियाही राबविली होती. त्यामध्ये आम्हाला सामावून घेणे शक्य होते. तीही कंत्राटी भरतीच होती. त्यात संधी दिली असती तर आमच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला असता अशा प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिल्या.
...तर या कर्मचाऱ्यांना प्राधान्य
तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. तसे काही झाले तर या कर्मचाऱ्यांनाच त्या संस्थेच्या प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले असून, त्यांनाच प्राधान्य देण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. निदान एवढा तरी दिलासादायक निर्णय या कर्मचाऱ्यांबाबत झालेला आहे.
पदनाम काढलेले कार्यरत
डॉक्टर ७७ ६
परिचारिका ६७ १८
आरोग्यसेविका ३८ ०
तंत्रज्ञ व इतर ८ २३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ९ १९