हिंगोली : बदलत्या जीवनशैलीमुळे ज्वारीला मागणी वाढली असून, ज्वारीचे भाव गव्हाबरोबर झाले आहेत. पूर्वी गव्हाचे उत्पादन फारसे होत नसल्याने खरेदी करणे परवडत नव्हते. परंतु, आता ज्वारीची श्रीमंती वाढली आहे.
धावपळीमुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. यातूनच विविध आजार जडत आहेत. यातूनच पचण्यास हलका व पोषक आहार घेण्याकडे कल वाढला आहे. ज्वारीची भाकर शरीरासाठी पोषक आहे. त्यामुळे आता शहरी भागात ज्वारीलाच मागणी वाढली आहे. पूर्वी गव्हाचे उत्पादन मुबलक होत नव्हते, तर ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे गव्हाची किंमत सामान्याच्या आवाक्याबाहेर असायची. मात्र, ज्वारीचा पेरा दिवसेंदिवस घटत गेला. जिल्ह्यात सध्या इसापूर धरणाच्या कालवा क्षेत्रातच रब्बी हंगामात ज्वारी घेतली जाते. उत्पादनात घट व ज्वारीतील पोषक तत्वे यामुळे ज्वारीला मागणी वाढली आहे. ज्यांच्या घरी ज्वारीची भाकरी त्याला श्रीमंत समजण्याचा नवा प्रकार रूढ झाला आहे.
भाकरी परवडायची म्हणून खायचो...
पूर्वी ज्वारीचे उत्पादन जास्त होते. प्रत्येकाच्या घरी वर्षभर पुरेल एवढे ज्वारीचे धान्य असायचे. गव्हाच्या चपात्या कधीतरी सणासुदीला खायला मिळायच्या. ज्वारी परवडायची म्हणून ज्वारीची भाकरीच खायचो.
- उकंडी हाटकर
पूर्वी ज्वारीची किंमत खूप कमी होती. गव्हाच्या चपात्या सणासुदीलाच मिळत होत्या. दोन वर्ष पुरेल एवढा ज्वारीचा साठा असायचा. आता मात्र गव्हाच्या चपात्या खाऊन कंटाळा आला आहे. पुन्हा ज्वारीची भाकरीच बरी वाटते.
- बबनराव कोल्हे
आमच्या काळात ज्वारीचा पेरा जास्त होता. दिवाळीला नवीन ज्वारी घरी यायची. महिनाभराच्या जमा झालेल्या पैशातून एखादी पायली गहू खरेदी करायला मिळायचे. मात्र, आता गव्हाऐवजी ज्वारीचीच भाकरी बरी वाटते.
- नारायणराव हापसे
आता चपातीच परवडते
कोरोनामुळे सध्या गहू माफक दरात मिळत आहे. त्यामुळे दररोजच्या आहारात गव्हाच्या चपातीचाच वापर होत आहे. घरचे सर्व सदस्य गव्हालाच पसंती देतात. ज्वारीची भाकरी कधीतरी खातो.
-
आपल्या आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच
१) ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा समावेश असतो. तसेच कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि खनिजदृव्य असे भरपूर घटक ज्वारीत असतात.
२) ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते. त्यामुळे वयाेवृद्ध ज्वारीची भाकरी खाणे पसंत करतात.
३) ज्वारीतील पोषक दृव्यांमुळे डॉक्टर, आहारतज्ज्ञ ज्वारी खाण्याचा सल्ला देतात. यामुळेच गव्हाची जागा ज्वारीने घेतली आहे.
जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले
हिंगोली जिल्ह्याला पूर्वी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जायचे. आता मात्र शेतकरी नगदी पिकांकडे वळले आहेत. जनावरांना चारा म्हणून काही पशुपालक तेवढे ज्वारी पिकाला पसंती देतात. सध्या जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. काही शेतकरी कापूस, हळद पिकाला पसंती देतात. यावर्षी जिल्ह्यात ६ हजार ८९१ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला असावा, असा अंदाज कृषी विभागाने लावला आहे.
अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रतिक्विंटल दर) (सरासरी)
२००२
गहू - ६४५
ज्वारी - २४९
२०१०
गहू -१४२६
ज्वारी - ७६४
२०२०
गहू - १५२०
ज्वारी -१७३१
२०२१
गहू -१८००
ज्वारी -१८५०
(स्रोत : कृउबा, हिंगोली)