हिंगोली : नैसर्गिक संकटांमुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्याखाली आले. त्यामुळे यंदा समाधानकारक दर मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दराची दिवसेंदिवस घसरगुंडी सुरूच असून, १७ डिसेंबर रोजी सरासरी केवळ ४ हजार ४४० रूपये क्विंटलने सोयाबीन विक्री झाले. अशीच परिस्थिती हळदीचीही असून, भाव गडगडले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
अलिकडच्या काळात खरिपात इतर पिकांच्या तुलनेत एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्मेच्या वर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होत आहे. नगदी पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांत नैसर्गिक संकटांचा मारा एकापाठोपाठ होत असल्याने पिकांना फटका बसत आहे. गेल्यावर्षी ऐन काढणीच्या वेळी अवकाळीचा फटका बसला होता. तर यंदा खरिपाच्या प्रारंभापासूनच अत्यल्प पाऊस, मध्यंतरी अतिवृष्टी आणि पीक ऐन भरात येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. किडीच्या प्रादुर्भावामुळे शेंगा परिपक्व होण्याआधीच वाळल्या. परिणामी, उत्पादन निम्म्याखाली आले.
उत्पादनात झालेली घट पाहता मोंढ्यात, खुल्या बाजारात किमान सहा हजार रूपयांचा भाव सोयाबीनला मिळेल अशी आशा होती. मात्र, डिसेंबरचे दोन-चार दिवस वगळता सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला ही गाठला नाही. तर मकर संक्रांती निमित्त १५ व १६ जानेवारी रोजी मोंढा, हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर १७ जानेवारी रोजी सोयाबीन, हळद, तुरीची बिट झाली. परंतु, सोयाबीन आणि हळदीच्या दरात घसरण झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. तर जवळपास २०० ते ३०० ने दर वधारल्याने तुरीला चमक आली. सोयाबीनप्रमाणे हळदीच्या दरातही घसरत झाली असून, बुधवारी सरासरी केवळ १० हजार ८३० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. त्यामुळे उत्पादकांच्या पदरी निराशा आली.