लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीनला वाढीव दर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच सर्व माल विक्रीची घाई करू नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.रविवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ.तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. दुगार्दास साकळे, गोवर्धन विरकुंवर, नगरसेवक गणेश बांगर यांची उपस्थिती होती.पटेल म्हणाले की, राज्यात कामाच्या शोधासाठी मजुरांचे स्थलांतर होणार नाही, याची काळजी शासन घेत आहे. गावपातळीवर विविध योजनेची कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी दोन वर्षपुरेल एवढे धान्य साठा असून जनावारांचा चाºयाचा प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, तापमानवाढीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे आता ढगफुटी किंवा दुष्काळ ही परिस्थितीच राहणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.राज्यात तूर खरेदीचे १६३ कोटी रुपये देणे शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठवून त्याची पावती मिळाल्यावरच पैसे मिळतात. त्यामुळे ही रक्कम अडकली. हरभरा खरेदीमधे नोंदणी केलेल्या शेतकºयांना फरकाची रक्कम दिली जाणार आहे. मात्र शेतकºयांनी दूरध्वनीवरून केलेली नोंदणी खरी होती किंवा नाही याची तपासणी केली जात असून दिवाळीनंतरच ही रक्कम दिली जाणार असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले.
भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:34 AM