हिंगोली : शहरातील वाहतूक काेंडीची समस्या नागरिकांची डाेकेदुखी बनली आहे, या मथळ्याखाली ‘लाेकमत’ने २९ ऑक्टाेबर राेजी बातमी प्रकाशित केली हाेती. या वृत्ताची पाेलीस प्रशासनाने दखल घेतली आहे. ३० ऑक्टाेबर राेजी पाेलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहरात फेरफटका मारून प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
शहरातील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतुकीची काेंडी हाेईल अशा पद्धतीने काेणीही वाहने उभी करू नयेत, असे आवाहन पाेलीस अधीक्षक कलासागर यांनी केले आहे.
यासंदर्भात वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पाेलीस अधीक्षक कलासागर यांनी हिंगाेली शहरातील महात्मा गांधी चाैक, महावीर स्तंभ परिसर तसेच इंदिरा गांधी चाैक यासह विविध भागात फेरफटका मारून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील रस्ता रूंदीकरणाचे कामे झाली तरीही शहरातील वाहतूक काेंडीचा प्रश्न अद्याप तसाच आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी हिंगाेली वाहतूक शाखेकडून यापूर्वी अनेकदा कारवाई करण्यात आली, शिवाय रस्त्यालगतचे अतिक्रमणही काढण्यात आले. वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक समस्या कायम आहे. आता खुद्द पोलीस अधीक्षकच रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीच्या शिस्तीसाठी नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. हातगाडेधारकांनाही शिस्त लावण्याची गरज आहे.
दुकानदारांनाही दिल्या सूचनाशहरातील मुख्य बाजारपेठेत अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर साहित्य ठेवल्याने पार्किंग थेट रस्त्यावर जाते. त्याचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे दुकानाबाहेर साहित्य ठेवू नये, अशा सूचना पोलीस अधीक्षक कलासागर यांनी काही विक्रेत्यांना दिल्या. तर वन वे असून अंमल होत नसल्याने त्यावरही कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.