हिंगोली : शासनाच्यावतीने जिल्हा परिषद, महसूल विभागातंर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रामुख्याने तलाठी पदासाठी लेखी परीक्षेकरिता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारांचे परीक्षा केंद्र अमरावती येथे आले आहे. या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी येथील एसटी आगाराच्या वतीने विशेष बस सुरू केली आहे. जवळपास पंधरा दिवस दररोज पहाटे ५:३० वाजता ही बस हिंगोली बसस्थानकातून रवाना होणार असून, ९:३० वाजता अमरावतीत पोहोचणार आहे.
महसूल विभागात कोतवाल, तलाठी तसेच जिल्हा परिषदांमध्येही नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे. १६ ऑगस्ट रोजी सहकार विभागातील पदासाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक परीक्षार्थी अमरावतीला गेले होते. या दिवशी अनेकांना अमरावती गाठण्यासाठी धावपळ करावी लागली. बस, रेल्वे, तसेच मिळेल त्या खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठावे लागले. येणाऱ्या दिवसात तलाठी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी नोकर भरती लेखी परीक्षेदरम्यान हिंगोली आगारातून अमरावतीसाठी विशेष बस सुरू करण्याची मागणी पुढे येत होती. त्यानुसार एसटी आगाराच्या वतीने पहाटे ५:३० वाजता अमरावतीसाठी बस सोडण्यात येत आहे. १७ ऑगस्टपासून ही बस सुरू करण्यात आली असून, जवळपास पंधरा ते वीस दिवस ही बस सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी दिली.
सकाळच्या सत्रातील परीक्षार्थींनी कशी गाठायची अमरावती?...तलाठी पदासाठी तीन सत्रात लेखी परीक्षा होणार आहे. सकाळी ७ वाजता पहिल्या सत्रात, त्यानंतर ११ वाजता दुसरे सत्र ते तिसऱ्या सत्रातील लेखी परीक्षा दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. हिंगोली आगाराच्या वतीने सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता लेखी परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांकरीता बस उपयोगी पडणार आहे. परंतु, ज्यांची परीक्षा सकाळी ७ वाजता आहे, त्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीच अमरावती गाठावी लागणार आहे. त्यासाठी सकाळी ६:३० वाजता अमरावती येथे पोहोचेल अशी बस सुरू करण्याची मागणी परीक्षार्थींतून होत आहे.
उमेदवारांच्या सोयीसाठी बससेवा...सध्या नोकर भरती सुरू असून अमरावती, अकोला येथे लेखी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. वेळेत बस किंवा इतर वाहन उपलब्ध झाले नाही तर उमेदवारांवर धावपळ करण्याची वेळ येते. परीक्षार्थींना केंद्र गाठणे सोयीचे व्हावे यासाठी हिंगोली आगाराच्या वतीने विशेष बस सोडण्यात येत आहे. दररोज पहाटे ५ वाजता हिंगोली ते अमरावती ही बस सोडण्यात येत आहे. या बससेवेचा उमेदवारांनी लाभ घ्यावा.- सूर्यकांत थोरबोले, आगार प्रमुख, हिंगोली