सभापती चव्हाण यांच्या जिल्हा परिषदअंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त करीत जि. प. सदस्य संजय देशमुख यांच्यासह ४३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ८७ अन्वये हा ठराव दाखल केला आहे. उक्त ठरावावर विचार करून सभा बोलाविण्यात यावी, असे नमूद केले आहे. यावरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ९ जूनरोजी दुपारी १२ वाजता विशेष सभा बोलावण्याचा आदेश दिला आहे. तर अविश्वास ठराव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिनियमातील कलम ४९ (४) नुसार पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना प्राधिकृत केले आहे.
जिल्हा परिषदेत आज यामुळे वातावरणात पुन्हा गरमागरमी दिसून येत होती. तर प्रशासकीय पातळीवरही आधी जि.प.च्या सभागृहात पाहणी करण्यात आली. मात्र हे सभागृह नादुरुस्त असल्याने स्थळ बदलून जिल्हा नियोजन समिती सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले.
ज्या एकजुटीने सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता, ती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होत होते, तर दुसरीकडे नेत्यांची मनधरणी करून अविश्वास टाळण्यासाठी सभापतींचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सदस्य नेत्यांनाच पटवून देताना दिसत आहेत. आता ९ जूनरोजीच चव्हाण यांचे भवितव्य ठरणार आहे.