हिंगोली : उशिरा पेरणी केलेल्या रबी ज्वारी पिकावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास शेतकऱ्यांनी डायमेथोएट ३० टक्के ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य मुख्य समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
ढगळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यावर झायनेब किंवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्यामुळे तांबेरा पडणार नाही. गव्हामध्ये उंदराचे प्रमाण दिसून येत असेल तर झिंक फॉस्फॉईड, गूळ, गव्हाचा भरडा व गोडतेल मिसळून त्यांचे मिश्रण उंदरांच्या बिळात टाकावे, त्यामुळे उंदरांचा नायनाट होतो. मृग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल १० मिली स्टीकर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. आंबा बागेत भुरी व करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी हेक्झाकोनेझॉल पाच मिली प्रती १० लिटर पाण्यात पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यामध्ये मोहोर फुलण्याच्या अवस्थेमध्ये शक्यतो फवारणी टाळावी. जेणेकरून परागीकरणावर परिणाम होणार नाही. तुडतुड्यासाठी पाच टक्के लिंबोळी अर्क अथवा थायमिथाक्झाम २५ टक्के दोन ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला दिला आहे.