लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औरंगाबाद बोर्डातर्फे दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ५३ तर बारावीची केंद्रावरून परीक्षा केंद्रावरून पार पडली. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा व शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत नक्कला केल्या त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीदरम्यान बारावीचे ७१ तर दहावीतील १२ परीक्षार्थी कॉपी प्रकरणात अडकले.जिल्ह्यात उच्च माध्यमिक बारावी प्रमाणपत्र परीक्षा २०१९ दिनांक २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत तर माध्यमिक शालांत इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत घेण्यात आली. सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी भेटी दिल्या. तसेच परीक्षा केंद्राना भेटी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना आदेशीत करण्यात आले होते. परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी जिल्हास्तरावर डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी डी.के. इंगोले, उपशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले, शोभा मोकळे असे पाच भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती. १२ वीच्या ३४ परीक्षा केंद्रावर ३४ बैठे पथक व इ. १० वी च्या ५३ परीक्षा केंद्रावर ५३ बैठे पथक परीक्षा कालावधीत नियुक्त करण्यात आले होते. १२ वी परीक्षेसाठी ३४ परीक्षा केंद्रावर १३२७५ विद्यार्थी व इ. १० वी परीक्षेसाठी ५३ परीक्षा केंद्रावर १७४४५ विद्यार्थीसंख्या होती. सदर परीक्षा करीता १२ वीस ६७५ व ई. १० वीस ९१६ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच परीक्षेच्या कामाकरिता मंडळाकडून जिल्ह्यात ७ परीक्षक कार्यालयाची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षेचे तालुक्यात संचलन सुव्यवस्थित होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी डी.सी. नांदे, आर.आर. पातळे, एन.बी. थोरात, एस.एस. बगाटे, उमेश राऊत यांनी कार्य केले. दहावी व बारावीतील एकूण उपस्थित विद्यार्थी संख्या, तसेच अनुपस्थिती असा दैनंदिन अहवाल शिक्षण विभागातील संबधितांनी सादर केला. तसेच कॉपी प्रकरण असल्यास तात्काळ माहिती अद्ययावत केली जात होती.एकंदरीत १२ वी व १० वी परीक्षेकरीता २१०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील परीक्षेचे नियोजन संतोष वडकुते, पुष्पराज कटके, एम.ए.सय्यद, गजानन पळसकर, विनोद करंडे यांनी केले. परीक्षा कालावधीत १२ वी चे ७१ कॉपी प्रकरण व इयत्ता १० वीचे १२ कॉपी प्रकरणे झाली. १२ वी व इयत्ता १० वी परीक्षा हिंगोली जिल्ह्यात शांततेत व सुरळीत संपन्न झाल्या. परीक्षे दरम्यान प्रशासकीय यंत्रणा व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. तसेच परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.