लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची पालखी मिरवणूक सोमवारी रात्री ८ वाजता काढण्यात आली. या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.रवळेश्वर मामा यांच्या भेटीसाठी गावातून सजावट करून पालखी काढली. यामध्ये भजनी पथक, भजनी मंडळे, बँड पथक अन्य भाविक महिला यांच्यासह गावातून मुख्य मार्गाने वाजत-गाजत रवळेश्वर मामांकडे जाऊन नंतर मंदिरामध्ये पोहोचली. सायंकाळी ८ वाजता निघालेली पालखी नागनाथ मंदिरामध्ये अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सहसचिव विद्याताई पवार, विश्वस्त गजानन वाखरकर, अॅड. मुंजाभाऊ मगर, डॉ.किशन लखमावर ,गणेश देशमुख, विश्वस्त देविदास कदम डॉक्टर पुरुषोत्तम देव सल्लागार, शिवाजी देशपांडे, सल्लागार डॉ.विलास खरात आदींच्या उपस्थितीमध्ये पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. श्रींची अतिशय सुबक सुंदर आणि पूर्ण सजावट केलेली मूर्ती पालखीमध्ये पुजारी श्रीपाद भोपी, आदित्य भोपी, नारायण भोपी, महादेव गोरे, रमेश गुरव, पुरोहित उन्मेष भोपी, श्रीपाद दीक्षित, महेश जोशी, महंत श्यामगिरी महाराज, महंत सुरेश गिरी महाराज अन्य परिसरातील सर्व गावकरी व भजनी मंडळे तसेच महिलांची संख्याही लक्षणीय होती. पालखी मुख्य मार्गावरून जात असताना गावातील महिलांनी आपल्या मुख्य दरवाजासमोर श्रींच्या पालखीचे औक्षण करून पूजाअर्चा करीत होत्या. चौका चौकांमध्ये विविध प्रकारची गवळणी भजनेही सादर केली.अशा आनंदाच्या उत्साहाच्या भरात पालखी रात्री १२ वाजता मंदिरामध्ये पोहोचली. त्यानंतर सर्व भजनी मंडळांना प्रसाद वाटप करून करण्यात आले. यावेळी मंदिरातील अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक शंकर काळे, उपव्यवस्थापक बापूराव देशमुख, सुरक्षा गार्ड महिला, सुरक्षा गार्ड कर्मचारी व गावातील खूप मोठ्या संख्येने गावकरी शिवभक्त उपस्थित होते. त्यामुळे पालखी सोहळ्यामध्ये रंगत आली होती.
श्रींचा पालखी सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:54 AM