रमेश वाबळे
हिंगोली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत मराठा समाजबांधवांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाकरीता ग्रामीण भागातील लाभार्थी, नागरिकांना आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एसटी बसेस २० ते २५ गावांतून परत पाठविल्या. यादरम्यान मराठा समाजबांधवांनी ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ अशा घोषणाही दिल्या.
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर १० मार्च रोजी दुपारी ३ वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी प्रशासनातील अधिकारी मागील आठवड्यापासून करीत असून, कार्यक्रमास गर्दी जमावी यासाठी विविध योजनांचे लाभार्थी, नागरिकांना आणण्याकरीता महामंडळाच्या हिंगोली जिल्ह्यासह परजिल्ह्यातील आगारांतील ३०० बसेस तसेच खासगी ४०० वाहने ठेवण्यात आली आहेत.
एसटी महामंडळाच्या बसेस ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रामीण भागातून नागरिकांना आणण्यासाठी सोडण्यात आल्या. परंतु, मराठा आरक्षणप्रश्नावरून अनेक गावात या बसेसमध्ये कोणीही न बसता रिकाम्या परत पाठविण्यात आल्या.
गुगुळ पिंपरी, चुंचा, आसेगाव, वारंगा फाटा, कृष्णापूर, गिरगाव, पुसेगाव, कुरूंदा, डोंगरकडा, खांडेगाव, उमरा, निशाणा, नर्सी नामदेव, वडद, आंबाळा, कडती, लोहगाव, हानवतखेडा आदी गावातून या बसेस परत पाठविण्यात आल्या. यादरम्यान मराठा समाजबांधवांनी संताप व्यक्त केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी आंदोलन केले. मात्र, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाच्या प्रचाराची गाडी येऊ देणार नाही, असा निर्णय घेत तुम्ही गावातून बस बाहेर न्यावी अशी विनंती चालकांना करण्यात आली. त्यामुळे या गावातून लाभार्थी, नागरिकांना आणण्यासाठी गेलेल्या बसेस रिकाम्याच आल्या.