हिंगोली : लॉकडाऊनमुळे बंद ठेवावी लागलेली एस.टी. बससेवा पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या हिंगोली आगाराच्या बसेस चार मार्गावर धावत असल्या तरी अद्याप म्हणावा तसा प्रवाशांचा प्रतिसाद दिसत नाही. जे काही प्रवासी एस.टी.ने प्रवास करीत आहेत त्यांनी मास्क, सॅनिटायझर घेतलाय ना, याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. याबाबत प्रवासी काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यातील बससेवा ठप्प पडली होती. त्यामुळे हिंगोली आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह दैनंदिन खर्चही निघणे आवघड होऊन बसले होते. त्यामुळे आगाराला मालवाहतुकीवर भर द्यावा लागला. यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा एस.टी. बस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून नांदेड येथे चार, तर वाशिम, वसमत, झिरो फाटा येथे प्रत्येकी दोन फेऱ्या सुरू केल्या आहेत. यातून दररोज जेमतेम २५ हजारांचे उत्पन्न हाती येत आहे. त्यामुळे अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद एस.टी.ला मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, इतर प्रवासी वाहनेही सुरू नसल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कामगार सध्या एस.टी.नेच प्रवास करीत आहेत. एस.टी.तून प्रवास करताना सोबत मास्क, सॅनिटायझर असल्याची खात्री केली जात आहे. शुक्रवारी येथील नांदेड जाणाऱ्या बसमध्ये मोजकेच प्रवासी होते. मात्र, सर्वांनीच मास्क घातल्याचे दिसत होते, तसेच वाहकही खबरदारी घेत आहेत.
दोन वेळा एस.टी.चे निर्जंतुकीकरण
हिंगोली आगारातून सध्या दहा बसेस धावत आहेत. सकाळी बस निर्जंतुकीकरण केल्यानंतरच आगारातून बस बाहेर पडत आहे, तसेच सायंकाळी बसफेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा बसचे निर्जंतुकीकरण केले जात असल्याची माहिती स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.
दीड महिन्यात अडीच कोटींचा तोटा
कोराेनामुळे मागील दीड महिना बस बंद होत्या. त्यामुळे हिंगोली आगाराला दररोज साडेपाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. दीड महिन्यात तब्बल अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहेे.
एस.टी.ची सर्वाधिक वाहतूक नांदेड मार्गावर
१) हिंगोली आगारातून सध्या चार मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत. यात नांदेड मार्गावर दिवसातून चार फेऱ्या होत आहेत.
२) त्यानंतर वसमत दोन, वाशिम दोन, तर झिरो फाटा येथे दोन फेऱ्या होत आहेत. हिंगोली आगाराला परभणी मार्गावर चांगले प्रवासी मिळतात.
३) मात्र परभणीत अजूनही एस. टी. बसेसला परवानगी नसल्याने या मार्गावर झिरो फाट्यापर्यंतच बस सोडावी लागत आहे.
दीड महिन्यानंतर एसटी बस सुरू झाली. त्यामुळे आता चालक-वाहकांनाही ड्युटी लागेल. प्रवाशांचीही गैरसोय दूर होऊन आगाराला उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. सध्या तरी रोटेशन पद्धतीने चालकांना ड्युटी मिळत आहे.
- आर. एम. पठाण, चालक, हिंगोली आगार
बसफेऱ्या सुरू झाल्याने आगाराचे उत्पन्न वाढून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मदत होईल, तसेच प्रवाशांची गैरसोय टळेल. -तान्हाजी बेंगाळ, वाहक तथा अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, हिंगोली आगार.
हिंगाेली आगारातील एकूण बसेस - ५८
सध्या सुरू बसेस - १०
एकूण कर्मचारी -३१४
एकूण वाहक - १२०
एकूण चालक - १२०
सध्या कामावर चालक - १०
सध्या कामावर वाहक -१०