कळमनुरी तालुक्यात १९ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. येथील मतदान इनकॅमेरा होणार आहे. यामध्ये तालुक्यातील नांदापूर, सालेगाव, पाळोदी, गौळबाजार, सोडेगाव, सेलसुरा,चिंचोर्डी, रामेश्वर तांडा, पोत्रा, तोंडापूर, आखाडा बाळापूर, सिंदगी, बऊर, साळवा, हिवरा, दांडेगाव, शेवाळा, डोंगरकडा, जवळा पांचाळ ही संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.
९० ग्रामपंचायतीसाठी ६२ हजार ५८० पुरुष, तर ५७ हजार ४२ महिला असे एकूण १ लाख १९ हजार ६२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी व मतदारांना मास्क असणे बंधनकारक करण्यात आहे. सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. मतदान केंद्रावर आशावर्कर यासाठी तैनात राहणार आहेत. १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत मिनीबस, जीप या १०० वाहनांने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना साहित्यांसह मतदान केंद्रावर पाठविण्यात आलेले आहेत.
कळमनुरी तहसील कार्यालयात साहित्य घेताना सामाजिक अंतराचे भान कोणालाच राहिले नव्हते. येथे सामाजिक अंतराचे पालन केले गेले नाही. दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. तालुक्यातील बिबगव्हाण, घोळवा, कवडा, कुंभारवाडी, कोपरवाडी, नवखा, पावनमारी, रामेश्वर, टव्हा, झुनझुनवाडी, उमरदरावाडी, तेलंगवाडी, माळेगाव ,डोंगरगाव नाका, येगाव, येहळेगाव गवळी, खापरखेडा, रेणापूर १९ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. या बंदोबस्तासाठी ७ पोलीस अधिकारी, ९७ पोलीस कर्मचारी, ५५ होमगार्ड व एसआरपीची एक तुकडी असा बंदोबस्त राहणार आहे. ६१५ जागेसाठी १३६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २६० उमेदवार बिनविरोध निवडल्या गेले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली आहे. फाेटाे नं. १६