वसमत (जि. हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वास्तव्यास असलेले गंगाप्रसाद अग्रवाल यांचा जन्म ७ जानेवारी १९२३ मध्ये झाला. अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात मॅट्रिक, तर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयात कॉमर्स इंटरपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.
यादरम्यान १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेऊन अग्रवाल यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. वसमत येथील झेंडा सत्याग्रह, आजेगावचा संघर्ष, जंगल सत्याग्रह या आंदोलनांचे अग्रवाल यांनी नेतृत्व केले. हिंगोली-परभणी जिल्ह्यांतील स्वातंत्र्यसैनिकांसह त्यांनी सशस्त्र लढाईत सक्रिय सहभाग घेतला. आजेगावचा रणसंग्राम त्यापैकीच एक आहे. या संग्रामात बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते.
मराठवाडा मुक्त झाल्यानंतर गंगाप्रसाद अग्रवाल यांनी महात्मा गांधींच्या विचाराचा प्रचार-प्रसाराचा वसा घेतला. स्वदेशी चळवळ स्वावलंबन, सेंद्रिय शेती, खादी ग्रामोद्योगचा प्रचार-प्रसार, सजीव शेती, राष्ट्र सेवा दलाचे कार्य, भूदान चळवळ, दुष्काळाविरोधातील संघर्ष, शेतकरी स्वावलंबी करण्याची मोहीम, शेतकरी आत्महत्याविरोधातील चळवळ, पाणी आंदोलन आदी समाज सुधारणांच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते.
१९६२ व १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी शांती सेनेसाठी कार्य करून निर्वासितांच्या छावणीमध्ये मदतकार्य करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. १९५३ मध्ये वसमतच्या नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. मात्र, राजकारणात त्यांचे मन रमले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत लढ्यात उडी घेतली. योगाचा प्रचार-प्रसारही त्यांनी केला. निरोगी आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे, असे ते म्हणायचे. गांधींचा विचार आचरणात आणावा, हा त्यांचा आग्रह असायचा. मनगट, मेंदू व मनाचा विकास करणारी शिक्षण पद्धती असावी, ही त्यांची कायम भूमिका राहिली.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांत जागृती अभियान प्रारंभ केले होते. शेती परवडत नसल्याने शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे. सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. जमिनीचा घसरणारा पोत, त्यामुळे उत्पादनात झालेली घट, त्यातून शेतीचे व शेतकऱ्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी व्हावा, यासाठी शेतकऱ्यांच्या सभा, शिबिरे त्यांनी देशभर घेतली. तरुण जागरूक करण्यावरही त्यांचा भर होता. त्यासाठी तरुणांची संघटना त्यांनी उभी केली.
राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना समाजसेवेला जोडण्याचे कार्य केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, गोविंदभाई श्रॉफ यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव हा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. याशिवाय बाळासाहेब भारदे पुरस्कार, मराठवाडाभूषण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.
कधीच भौतिक वादात न अडकता अखंडितपणे समाजसेवा करणारे स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची कायम ओळख राहणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात व हैदराबाद मुक्तिसंग्रामात झुंजणाऱ्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी मृत्यूशीही कडवी झुंझ दिली. अखेर ९६ व्या वर्षी हा लढवय्या सेनानी ‘मराठवाड्याचा गांधी’ नावाचा तारा कायमचा निखळला.
महाराष्ट्राचे नुकसान झालेगंगाप्रसाद अग्रवाल हे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा आणि सर्वोदयी चळवळ यामध्ये अग्रणी भूमिकेत होते. त्यांच्या जाण्याने केवळ मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हे एक लोकविलक्षण असे पर्व होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारला गेला. यामध्ये मराठवाड्यातील गोविंदभाई श्रॉफ, डॉ.शंकरराव चव्हाण, अनंतराव भालेराव, बाबासाहेब परांजपे, माणिकराव पहाडे यांच्यासह अग्रवाल यांचेही योगदान मोठे होते. अग्रवाल यांनी महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वराज्य आणण्यासाठी झेंडा सत्याग्रह, जंगलतोड सत्याग्रह आणि भूदान चळवळीत काम केले. आपण स्वातंत्र्य सेनानी आणि सर्वोदयी नेत्यास गमावले आहे. - अशोक चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी