हिंगोली : जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांसाठी ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत ३ दिवसीय कार्यशाळेस मंगळवारपासून प्रारंभ झाला. यावेळी प्राचार्य गणेश शिंदे यांनी केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन केले.जि. प. व विनाअनुदानीत शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांमध्ये शंभर टक्के मुलभूत वाचन लेखनक्षमता प्रगल्भ व्हावी, यासाठी हिंगोली येथील डायट महाविद्यालयाच्या सभागृहात ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा व त्यांना हसत-खेळत शिकविता यावे, यासह विविध विषयासंदर्भात माहिती दिली जाणार आहे.मुलांची लेखन क्षमता प्रगल्भ होण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. कार्यशाळेत केंद्रप्रमुखांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला असून त्याअनुषंगाने कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. डायटचे सुलभक प्रवीण रूईकर, दीपक कोकारे, भाषा विभाग प्रमुख श्रीहरी दराडे प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणानंतर ९० दिवसांच्या या उपक्रमानंतर विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येणे शक्य होईल, असे सांगण्यात आले. कार्यशाळेत केंद्र प्रमुखांना रिंगण करून गीतांचा सराव करून घेण्यात आला.
हिंगोलीत केंद्रप्रमुखांच्या कार्यशाळेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:53 PM