वसमत (जि.हिंगोली) : खुदनापूर शिवारात एका शेतातील आखाड्याजवळ चालणाऱ्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारुन १० आरोपींना ताब्यात घेतले. वसमत ग्रामीण पाेलिसांनी ४ डिसेंबर राेजी ही कारवाई करताना त्यांच्याकडून ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वसमत उपविभागातील कुरुंदा पोलीस ठाणे, वसमत ग्रामीण ठाणे, हट्टा ठाणे, शहर पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांविरुद्ध छापा सत्र मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. छुपे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे पोलिसी खाक्याने धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील खुदनापूर येथे भारत चव्हाण यांच्या शेतातील आखाड्याजवळ चालणाऱ्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर शनिवार, ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, फौजदार शिंदे, जमादार अविनाश राठोड, पंडित, विभुते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा मारला.
यावेळी आरोपी विश्वनाथ डरंगे (रा. वसमत), अविनाश खरे (रा. थोरावा), ज्ञानेश्वर माकणे (रा. रुंज), भारत चव्हाण (रा. खुदनापूर), सतीश इंगोले (रा. मालेगाव), तुकाराम गारोडे (रा. आसेगाव), राघोजी गजभार, देवानंद जगताप, ज्ञानेश्वर गायकवाड (सर्व रा. आसेगाव), (एमएच ३८, झेड ९२६० गाडीचा मालक, नाव माहीत नाही) त्यांना ताब्यात घेत जुगार साहित्य, रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाईलसह ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वसमत पाेलीस करत आहेत. अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने छापा सत्र मोहीम राबविताच छुप्या, अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.