हिंगोली येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमास सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हजेरी लावली. गर्दी पाहताच त्यांनी ती तत्काळ हटविण्यास सांगितले. शिवाय आधीही इतर कोणतेही सोपस्कार करायचे नाही, असे बजावल्याने एका क्रेनवर लटकवून ठेवलेला एक क्विंटलचा हारही तत्काळ जागेवरून हलविला. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्याचा हिरमोड झाला. त्यानंतर युवक, शहर, जिल्हा, सेनगाव व हिंगोली तालुका अशी कार्यकारिणीनिहाय बैठक घेतली. त्यात आगामी न.प., न.पं., जि.प. व पं.स. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बळकटीकरण करण्यास सांगितले. केवळ कार्यकर्ता म्हणून मिरविण्यापेक्षा चार लोकांची कामे करा. त्यातून पक्षाच्या पाठीशी माणसे जोडा. लोकांची कामे केली तरच पक्ष बळकट होईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला काही वेळानंतर समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनीही हजेरी लावली. तसेच माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ.राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष मनीष आखरे, अनिल पतंगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी वरच्या मजल्यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या ठिकाणी रुपाली चाकणकर, जयसिंगराव गायकवाड यांच्यासह पक्षाची नेतेमंडळी हजर होती.