हिंगोली: प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात प्रवासी संघटनेने स्टेशनमास्तरमार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना १ जानेवारी रोजी निवेदन पाठविले आहे. या निवेदनात आठ मागण्यांचा समावेश आहे.
कोरोना संसर्गामुळे मार्च ते ऑक्टोबर २०२० अशी आठ महिने रेल्वेसेवा बंदच होती. नोव्हेंबरनंतर तीन रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, त्या एक्स्प्रेस असल्यामुळे सर्वसामान्यांना त्या परवडणाऱ्या नाहीत. दुसरीकडे त्यासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागत आहे. अकोला - पूर्णा मार्गावरून मार्च २०२० पूर्वी धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वेगाड्या जनरल डब्ब्यांसहित पुन्हा सुरू कराव्यात, साप्ताहिक रेल्वेची फेरी वाढवावी, अजनी- हिंगोली- कुर्ला साप्ताहिक रेल्वे दररोज सोडून या रेल्वेचे भारतरत्न स्व. नानाजी देशमुख एक्स्प्रेस असे नामकरण करावे, हिंगोलीजवळ रेल्वेगेटवर नवीन उड्डाणपूल व स्थानकावर पादचारी पूल बांधण्याचे काम संथगतीने सुरू असून त्यास गती द्यावी, अकोला-पूर्णा मार्गाचे विद्युतीकरण तातडीने पूर्ण करून या मार्गाचे दुहेरीकरण तसेच अकोट-अमला खु.- खंडवा रेल्वेमार्गाचे रुंदीकरण करावे, वाशिम ते बडनेरा या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी द्यावी, हिंगोली रेल्वेस्थानक परिसरात कोल्डस्टोरेज सुविधेसह एक गोदाम बांधण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, सचिव जेठानंद नेनवाणी, भरतलाल साहू, डॉ. विजय निलावार, गणेश साहू, संजय भक्कड, केशवराव मगर आदींच्या सह्या आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा, स्टेशन मास्तर रामसिंग मीना व भूपेंद्रसिंग यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.