हिंगोली : पाऊस अचानक थांबल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
दोन-चार दिवसांपासून अचानक पावसाने उघाड दिली आहे. त्यामुळे उन्हाचे चटकेही सहन करावे लागत आहेत. कधी ढगाळ तर कधी दमट वातावरण निर्माण होत असल्याने साथीच्या आजाराला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. वयोवृद्ध व लहान मुलांना हे बदललेले वातावरण हानिकारक असल्याने तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. ताप, खोकला असल्यास लवकरात लवकर जवळच्या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
वातावरण बदलले; काळजी घ्या...
मागील पंधरा-वीस दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, डोके दुखणे आदी आजाराला सामोरे जावे लागत आहे.
दुसरीकडे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे साथीच्या आजारानेही डोके वर काढले आहे.
ताप, खोकला, सर्दी, अंगावर पुरळ येणे आदी आजाराबाबत शंका आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रावर जाऊन औषधोपचार घेणे गरजेचे आहे.