सेनगाव (हिंगोली ) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार अपात्र संचालकांवरील कारवाईस सहकार व पणन मंत्र्यांनी आज स्थगिती देत मोठा दिलासा दिला. या प्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांच्यावरील कारवाईस स्थगिती देण्याचे आदेश त्यांनी दिले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे ग्रामपंचायत मतदार संघातील संचालक सुमित्रा नरवाडे, अमोल हराळ, संजय देशमुख, गोदावरी शिंदे या चार संचालकाविरोधात संचालक दत्तराव टाले यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सदर संचालक विद्यमान ग्रा.प.चे सदस्य नाहीत, त्यामुळे त्याचे पद रद्द करावे अशी तक्रार केली होती. या संबंधी जिल्हा उपनिबंधक यांनी सुनावणी घेवून ग्रा.प.मतदार संघातील चारही संचालकांना अपात्र घोषित केले. या विरोधात चारही संचालकांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे आव्हान दिले. परंतु; सहनिबंधकांनी त्यांच्यावरील कारवाई कायम ठेवली. यामुळे या संचालकांनी थेटसहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे याप्रकरणी दाद मागितली.
या अपिलावर सहकार मंत्र्यांनी बुधवारी (दि.२) सुनावणी घेत या प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत सर्व संचालकांवरील कारवाईस स्थगिती दिली. यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत चारही जण संचालकपदी कायम राहतील.