कुरुंदा : हिंगोली जिल्ह्यात एकमेव आडवी बाॅटल झालेला पांगारा शिंदे हे गाव आहे. या गावात अवैध दारूचा बोभाटा सुरू होता. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्तही दिले होते. अखेर ग्रा.पं. निवडणूकतील मतदानाच्या दोन दिवसआगोदर गावात १२ जानेवारी रोजी ४२ हजारांची दारू व एक जीप एकूण ३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कुरुंदा पोलिसांनी केली.
पांगारा शिंदे येथे महिलांनी आंदोलन करून दारूची बाॅटल २०१६ मध्ये आडवी केली होती. कालांतराने अवैध दारू विक्री सुरू झाली व ग्रामस्थांना त्याचा त्रास सोसावा लागला. ‘आडवी बाॅटल होऊनही दारू विक्री’ असे वृत्तांत काही दिवसाखाली ‘लोकमत’ने दिले होते. ग्रामीन भागात ग्रा. पं. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने, ओल्या प्रचाराकरिता दारू साठविण्याचा प्रकार अवैध दारू विक्रते करीत आहेत. कुरुंदा पोलिसांनी सलग दोन दिवसांपासून दारू पकडण्याची मोहीम गतिमान केल्याने वाई शिवारात मोठा दारूचा साठा पकडल्यानंतर, आता पांगारा शिंदे ४२ हजार रुपयांची दारू पकडून धाडसी कारवाई केली.
पांगारा शिंदे येथे जुनी जीप क्रमांक एम.एच.-डी-२४६५ यामध्ये अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने चोरट्यामार्गे दारू साठवून १७ दारूचे बाॅक्स आणले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच, मंगळवारी रोजी रात्री साडेदहा वाजता पोलीस पथकाने त्यावर धाड टाकून कारवाई केली. त्यात ४२ हजार ४३२ रुपयांची दारू व एक जीप असे ३ लाख ४२ हजारांचे मुद्देमाल जप्त केले. ही कारवाई सपोनि सुनील गोपीनवार, फोजदर बोधणकर यांच्या पथकांनी केली.
सपोनि सुनील गोपीनवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल शिंदे, सुशील शिंदे या दोघांविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिरडशाहापूर येथेही दारू व मोटारसायकल जप्त
कुरुंदा पोलीस हद्दीतील शिरडशहापूर येथे मंगळवारी पोलीस गस्त घालत होते. यावेळी एका मोटारसायकलस्वाराला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, मोटर सायकलने दारूचे बॉक्स जाग्यावर सोडून आरोपी घटनास्थळावरून पळाला. यामध्ये २ हजार ५०० रुपयांची दारू व एक मोटारसायकल क्रमांक एमएच ३८-यू १५३४ जप्त करण्यात आली. त्यात ३२ हजार ४९६ रुपयांचा मुद्देमाल आहे. पोलीस नायक शंकर भिसे यांच्या फिर्यादीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.