कळमनुरी ( हिंगोली): बसमध्ये एका महिलेचे साडेचार तोळे सोने पळविणाऱ्या चार महिला चोरट्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले. ही थरारक घटना आज दुपारी दीड वाजेच्या दरम्यान माळेगाव येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योती मानाजी पुरी या आपली नात धनश्री गिरीसोबत आज दुपारी किनवट - औरंगाबाद ( बस क्र एम एच 14 बीटी 3015 ) या बसने माहूर येथून सकाळी औरंगाबादकडे जाण्यासाठी निघाल्या. माळेगाव येथे चार महिला लहान मुलांसह बसमध्ये चढल्या. चौघीही ज्योती पुरी यांच्या बॅगजवळ बसल्या. प्रवासादरम्यान, बॅगमधून त्यांनी साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने काढून घेतले. या महिलांची संशयास्पद हालचाल आणि बॅगची उघडी चैन पाहून ज्योती यांनी संशय आला. बॅग तपासली असता त्यांना दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. यामुळे ज्योती यांनी आरडाओरड करत वाहकाला चोरीची माहिती दिली.
दरम्यान, बस कळमनुरीचा बसस्थानकात आली होती. बस उभी राहताच चौघी महिला लागलीच खाली उतरून दुसऱ्या वाहनाने पुढे गेल्या. पोलिसांना चोरीची माहिती देण्यात आली. यावरून सपोनी श्रीनिवास रोयलावार , फौजदार कृष्णा सोनुळे, सोपान सांगळे, सुनील रिठे, प्रशांत शिंदे, सीमा पाटील, शिवाजी देवगुंडे यांनी बसस्थानकात येत दागिने लंपास करणाऱ्या महिलांचा शोध सुरू केला. पोलिसांनी तपास करत माळेगाव गाठले. या महिला एका खाजगी बसमधून माळेगाव येथेच उतरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. येथे चारही महिला एका गोठ्यात लपलेल्या आढळून आल्या. पोलिसांना पाहताच चौघीही पळत सुटल्या. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून या चारही महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. झडती घेतली असता त्यांच्याकडे लंपास झालेले साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने आढळून आले. हे दागिने जप्त करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या चार महिलांकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.