हिंगोली: वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे सेनगाव तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी एकत्र येऊन सेनगाव येथील टी पॉइंटजवळील रस्त्यावर जवळपास तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
सेनगाव शहरासह ग्रामीण भागात वीज वितरण सेवा मोठ्या प्रमाणात ढेपाळली आहे. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रोहित्र नादुरुस्त असून वीज वितरण बिघडले आहेत. अनेक कृषी पंपाचा वीजपुरवठा दिवसभर बंद राहत आहे. वीज बिल वसुलीचे कारण देऊन वीज वितरण कंपनीचे अधिकारी लक्ष देत नाहीत. महावितरण कंपनीला सांगूनही काही उपयोग होत नाही. अधिकाऱ्यांची वाट पाहून शेतकऱ्यांना रोहित्र दुरुस्त करावी लागत आहेत.
अनेक भागात दिवसाला जेमतेम तीन ते चार तासही वीज मिळत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी येथील हिंगोली ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर जिंतूर टी-पॉइंट येथे शेतकऱ्यांनी ४ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास तीन तास झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाले होती. वीज वितरण कंपनीच्या विरोधातील भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
रास्ता रोको आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख रमेश शिंदे, शेतकरी संघटनेचे माधव गाडे राष्ट्रवादीचे हिंगोली तालुकाध्यक्ष डॉ. माधव कोरडे, माजी उपसभापती भिकाजी अवचार, एकनाथ शिंदे, ममताज हिंगमिरे, नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाला होते.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...यावेळी वीज वितरण कंपनीच्या वतीने सहायक उपअभियंता सत्यनारायण वडगावकर, कनिष्ठ अभियंता पंकज घुहे यांनी लेखी आश्वासन दिले. यानंतर हा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक रंजीत भोईटे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.