हिंगोली : जिल्ह्यातील कोविशिल्ड तर केव्हाच संपली होते, तर कोव्हॅक्सिन लस संपण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्ह्यातील ३३ केंद्रांपैकी काही ठिकाणचे लसीकरण थांबले होते. जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाने केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन्ही लस हिंगोलीत मंगळवारी दाखल होणार असून, लसीकरण सुरू होणार आहे.
२३ एप्रिलपासून जिल्ह्यातील ३३ केंद्रातील कोविशिल्ड संपली आहे. याबाबत राज्य शासनाला कळविलेही होते. दोन्ही लस संपल्यामुळे लसीकरण थांबले होते. लसीकरणाबाबत अनेक नागरिकांनीही जिल्हा रुग्णालयाकडे विचारही केली होती. नागरिकांचा उत्साह पाहता, जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाने याचा पाठपुरावा केला. राज्य शासनाने याची दखल घेत, हिंगोली जिल्ह्याकरिता कोविशिल्ड व्हॅक्सिनचे १० हजार डोस तर कोव्हॅक्सिनचे ९६० डोस प्राप्त करून दिले असून, मंगळवारी म्हणजे २७ एप्रिल रोजी सर्वच ठिकाणचे लसीकरण सुरू होणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. यापुढील लसीकरण वेळेवर आणि न थांबता कसे होईल, यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालय प्रयत्न करीत आहे. आजमितीस तरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळदरी येथे ३०-३० डोस, ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ येथे ८० कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक आहेत.