हिंगोली : मागील पंधरवड्यापासून अवकाळी संकट जिल्हावासीयांची पाठ सोडत नसून, अवकाळीच्या माऱ्यात आठवडाभरात विजेचे २० खांब कोसळले असून, वाहिन्याही तुटल्या. या नुकसानीमुळे महावितरण गार झाले असून, वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पावसासह वादळी वारा सुटत आहे. या संकटात महावितरणला फटका बसत असून, गत आठवड्यात हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, गांगलवाडी, सिद्धेश्वर भागात वीज वाहिन्यांचे नुकसान झाले होते. ती दुरुस्ती होते न होते तोच २२ एप्रिल रोजी रात्री हिंगोली शहरासह डिग्रस कऱ्हाळे, गांगलवाडी, सिद्धेश्वर भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाड्यांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या. तर गांगलवाडी शिवारात लोखंडी खांब वाकून जमिनीला टेकल्यामुळे सिद्धेश्वर, डिग्रस कऱ्हाळे येथील जलशुद्धीकरण केंद्राची वीज खंडित झाली. नर्सी नामदेव, पहेणी, कडती, हनवतखेडा, देऊळगाव जहांगीर, गांगलवाडी, डिग्रस कऱ्हाळे भागात सर्वाधिक नुकसान झाले.
मागील पंधरवड्यापासून या अवकाळी संकटात महावितरणला मोठा फटका बसत आहे. एकीकडे नुकसान होत असताना दुसरीकडे दुरुस्तीसाठी मनुष्यबळ आणि साहित्य लागत आहे. त्यामुळे महावितरणचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यातच वीज खंडित होत असल्याने ग्राहकांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागत आहे.
पाणीपुरवठ्यास व्यत्यय...२२ एप्रिल रोजी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मारा झाल्याने डिग्रस कऱ्हाळे, सिद्धेश्वर भागात वीज वाहिन्यांसह खांब वाकले. यात गांगलवाडी शिवारात लोखंडी खांब वाकून पार जमिनीवर टेकला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, हिंगोली शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे नगर पालिकेच्या वतीने सांगण्यात आले असून, एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
वीजपुरवठ्यावर परिणाम...वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज खांब वाकणे, वाहिन्या तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हिंगोली शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे. हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गूल झालेला वीजपुरवठा मध्यरात्री २ वाजता सुरळीत झाला. तर हिंगोली शहरात रात्री ११ वाजेच्या सुमारास वीज गूल झाली होती. जवळपास तासभर वीजपुरवठा गूल होता.