लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : देशामध्ये आतंकवाद्यासाठी न्यायालयाचे दरवाजे रात्री १२ वाजता उघडतात. मात्र, सर्वोच्च न्यायालय राम मंदिर खटल्यात ‘तारीख पे तारीख’ देत आहे. सध्या भाजपचे सरकार असून संसदेत प्रस्ताव आणून कायदा करावा अन्यथा तुफान उठेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी ३ डिसेंबर रोजी हिंगोलीत रामलीला मैदान येथे आयोजित हुंकार सभेत दिला.यावेळी दिगंबर शिवाचार्य महाराज, विष्णू गिरी महाराज, कान्हेराज बाबा पारसकर, सुभाष गिरी महाराज, धोंडीराम पाठक, खुशालचंद्र महाराज, विभाग संघचालक शिलचंद्र देशमुख, विहिंपचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर तोष्णीवाल आदींची उपस्थिती होती. गायकर म्हणाले, देशात पुन्हा निजाम निर्माण करण्याचे षडयंत्र ओवेसी रचत असून हिंदूंनी राम मंदिर निर्माणासाठी पेटून उठावे. देशातील कोट्यवधीे हिंदूंचा आत्मा असलेल्या रामासाठी न्यायालय चालढकल करत आहे. न्यायाधीश हे राम आणि देशापेक्षा मोठे आहेत काय? १९९२ मध्ये राम मंदिरासाठी राम भक्तांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. राम हे या देशाचे व भूमिचे प्राण आणि अस्तित्व आहेत. सर्वोच्च न्यायालयाला ९ हजार पानांचे पुरावे ५० हजार दस्ताऐवज, पुरातन संस्कृतीचे पुरावे सादर केले आहेत. हिंदू समाज सहिष्णू असला तरीही राम मंदिर निर्माणासाठी आता संकल्प करावा लागेल, असेही गायकर यांनी सांगितले.शरयूच्या तिरावर १९९२ ला हिंदू बांधवांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. बलिदान दिलेल्या या राम भक्तांचे स्मरण करुन हिंदुंनी पेटून उठावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रभू रामचंद्र भारताचे श्रद्धास्थान आहे. यासाठी संसदेत कायदा करुन राम मंदिराचे निर्माण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.
‘...तर राममंदिरासाठी तुफान उठेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:32 AM