लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील आपले सरकार केंद्रांमधून सर्व प्रकारच्या सेवा मिळाव्यात, ग्रामपंचायतींनाही फायदा व्हावा यासाठी बळकटीकरणाकडे लक्ष दिले जात आहे.जिल्ह्यात जि.प.च्या पंचायत विभागाकडे नोंदणीकृत असलेले ३८३ आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी ६२ ठिकाणी आता विविध ४३६ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये रेल्वे तिकीट, विमान तिकीट, वीज देयक, विमा हप्ते, पीक विमा अशा बाह्य संस्थांच्या सेवांचाही समावेश आहे. विविध प्रकारची प्रमाणपत्रे काढण्यासाठीही आता या केंद्रातूनच ग्रामस्थांना जावे लागत आहे. त्यामुळे या केंद्राचे आर्थिक उत्पन्न वाढत असून त्यात संबंधित आॅपरेटरचाही फायदा होणार आहे. या बळकटीकरणासाठी मागील काही दिवसांपासून जि.प.कडून प्रयत्न केले जात होते. त्यात जिल्ह्यातील ६२ केंद्रांमध्ये प्रतिसाद मिळाला आहे. सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामीण पातळीवरच उपलब्ध होतील. तर अनेक मोठ्या गावांतील आॅपरेटर्सला यातून मोठा फायदा होत असल्याने ते यात चांगले काम करीत आहेत. अशांना प्रोत्साहन देण्याचे काम करून इतरांनीही अशा सुविधा सुरू करण्यासाठी ग्रामसेवकांना सूचना दिल्या असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी सांगितले.
आपले सरकार केंद्रांचे बळकटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:22 AM