हिंगोली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर एस. टी. महामंडळ व ट्रॅव्हल्स मालकांनी बसेस सुरू केल्या आहेत. परंतु, अजूनही ट्रॅव्हल्स व एस.टी.च्या रातराणी बसेसला म्हणावा तसा प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नाही. कोरोना ओसरत चालला असला तरी कोरोनाची भीती अजूनही प्रवाशांमध्ये घर करून राहिल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या हिंगोली ते पुणे, हिंगोली ते औरंगाबाद, परभणी ते नागपूर अशा ट्रॅव्हल्स रातराणी बसेस आहेत. कोरोनाआधी प्रवाशांच्या सोयीसाठी हैदराबादला ट्रॅव्हल्स सुरू होती. परंतु, प्रवासी मिळत नसल्यामुळे सद्य:स्थितीत बंद असल्याचे खुराणाचे मालक जगजितराज खुराणा यांनी सांगितले. एस. टी. महामंडळाच्या बसेस आरामदायी नसतात म्हणून काही प्रवासी जास्तीचे पैसे देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास करू लागले आहेत. एस. टी. महामंडळाच्या दोन रातराणी बसेस सध्या सुरू आहेत. यामध्ये हिंगोली ते पुणे आणि हिंगोली ते कोल्हापूर या बसेसचा समावेश आहे. महामंडळाकडे आजमितीस शिवशाही बसेस सात आहेत. महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये हिंगोली पुणे, हिंगोली ते सोलापूर, हिंगोली ते औरंगाबाद, हिंगोली ते हैदराबाद या बसेस आहेत, असे स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी सांगितले.
एस. टी. च्या सुरू असलेल्या रातराणी...
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर एस.टी. महामंडळाने सद्य:स्थितीत दोन रातराणी सुरू केल्या आहेत. त्यामध्ये हिंगोली-पुणे आणि हिंगोली-कोल्हापूर या बसेसचा समावेश आहे.
महामंडळाकडे एकच स्लीपर...
एस. टी. महामंडळाकडे हिंगोली ते औरंगाबाद ही एकच गाडी स्लीपर आहे. बाकी गाड्या सिटिंग आहेत. परंतु, सर्व गाड्या वेळेवर धावतात, असे एस. टी. महामंडळाने सांगितले. हिंगोली-पुणे, हिंगोली-कोल्हापूर या रातराणी साध्याच आहेत.
एस. टी. पेक्षा तिकीट जास्त...
हिंगोली ते पुणे एस. टी. महामंडळाचे तिकीट ७०५ रुपये तर ट्रॅव्हल्सचे तिकीट स्लीपर (सिंगल) ८०० तर स्लीपर (डबल) ७०० रुपये आहे. प्रवास भाडे जास्तीचे असले तरी ट्रॅव्हल्स आरामदायी असतात, असे प्रवाशांनी सांगितले.
स्वच्छ आणि आरामदायी प्रवास म्हणून...
ट्रॅव्हल्सचा प्रवास हा कधीही एस. टी. महामंडळापेक्षा आरामदायीच आहे. कामानिमित्त महिन्यातून दोन ते तीनवेळा तरी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. ट्रॅव्हल्सने प्रवास केल्यास थकवा येत नाही.
-सौरभ सिंग, प्रवासी
एसटी बसेसपेक्षा ट्रॅव्हल्सचा प्रवास कधीही सुखकर असाच आहे. पैसे जास्त मोजावे लागत असले तरी प्रवासात कोणताही त्रास होत नाही म्हणून तर ट्रॅव्हल्सचा प्रवास आवडतो.
-शुभम तिवारी, प्रवासी