लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना समुपदेशानाने पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेस सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया ही मंगळवारपर्यंत चालणार आहे.होकार दिलेल्या शिक्षकांनी जि.प. सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ६ वी ते ८ वी या वर्गांना शिकविण्यासाठी होकार दिलेल्या पात्र शिक्षकांना समुपदेशन प्रक्रियेद्वारे विषय शिक्षकांसाठी पदोन्नती दिली जाणार आहे. याबाबत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी १७ नोव्हेंबर रोजी पत्र काढले होते. तसेच शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्या अनुषंगाने १९ नोव्हेंबरपासून सदर प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली. विज्ञान-गणित, सामाजिकशास्त्र व भाषा या तीन विषयांची दर्जाेन्नती देण्यात येत आहे. सदर प्रक्रियेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले व गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे, गशिअ राजेश पातळे यांच्यासह शिक्षण विभगातील अधिकारी उपस्थित होते. पात्र शिक्षकांना कार्यरत शाळेवरच जागा रिक्त असेल तर तेथेच पदस्थापना देण्यात येणार आहे. कार्यरत शाळेवर विषय शिक्षकाची जागा रिक्त नसेल तर केंद्रांतर्गत शाळेत पदस्थापना देण्यात येईल. जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या ६७२ जागा रिक्त आहेत. होकार दिलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेस सोमवारी प्रारंभ झाला असून मंगळवारपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.होकार दिलेल्या विषय शिक्षकांना त्यांच्या रिक्त असलेल्या त्यांच्याच शाळेत विषय शिक्षक म्हणून दर्जोन्नती देण्यात आली. जवळपास ४०० शिक्षकांना सोमवारी समुपदेशनाने विषय शिक्षक म्हणून दर्जोन्नती देण्यात आली. विषय शिक्षकांच्या जागा रिक्त आहे तेथील शाळेतील होकार दिलेल्या शिक्षकांना दर्जोन्नती दिली असून उर्वरित प्रक्रिया आता मंगळवारी पार पडणार आहे. यावेळी जि. प. सभागृह परिसरात शिक्षकांची मोठी गर्दी जमली होती. तर अनेक शिक्षक या प्रक्रियेच्या तक्रारीही करताना दिसून येत होते.शिक्षकांना समुपदेशानाने पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेदरम्यान मात्र लाऊडस्पीकरची सुविधाच नव्हती. त्यामुळे नेमका होकार की, नकार दिला जात आहे, याचाच ताळमेळ लागत नव्हता.
दर्जोन्नतीसाठी विषय शिक्षकांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:18 AM