लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. विहीर व बोअर अधिग्रहणासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. पंचायत समितीने ३२ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत. त्यापैकी फक्त चार प्रस्तावांना मंजुरी मिळालेली आहे.वसमत तालुक्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी पाणीटंचाईच्या झळा तीव्र भासत आहेत. भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. बोअर व हातपंप बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर उपाययोजना होत आहे. ग्रामपंचायतींनी बोअर व विहिरी अधिग्रहणासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. त्यापैकी ३२ प्रस्ताव पंचायत समितीने तहसीलकडे पाठवले आहेत.त्यांना तात्काळ मंजुरी मिळून ग्रामीण भागाला पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र तहसीलमार्फत अधिग्रहणाच्या प्रस्तावांची तपासणी करून अहवाल मागवला जात आहे. मंडळ अधिकारी, तलाठ्यांमार्फत नायब तहसीलदार प्रस्तावाचा अहवाल मागवून घेत आहेत. अहवाल जसा येईल तसे अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत आहे. आजवर फक्त चार प्रस्ताव मंजूर झाले आहेत. उर्वरित प्रस्तावांना कधी मंजुरी मिळणार, याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष लागले आहे.तालुक्यात यावर्षी कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असलेले बोअर व विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. सिंचनासाठी पाणी मिळाले नाही, पर्जन्यमान कमी; परिणामी, पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. दरवर्षीच्या तुलनेत ज्यादा टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. महसूल प्रशासनाने अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीची गती वाढवणे अपेक्षित आहे.
अधिग्रहणाचे ३२ प्रस्ताव तहसीलला सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:37 AM