नांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे रेल्वेचा भुयारी मार्ग असून दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद होतो. त्यामुळे या ठिकाणाहून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. सोमवारी दुपारी पडलेल्या पावसामुळे एक तास वाहतूक बंद पडली होती.
१२ जून व १४ जून रोजी नांदापूर व परिसरात चांगला पाऊस झाला. दोन्ही दिवस भुयारी मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. भुयारी मार्गाखालील पाण्याचा व्यवस्थितरीत्या निचरा करण्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने नाली तयार करण्यात आली आहे. परंतु, सदरील नाली कित्येक दिवसापासून बुजली गेली आहे. त्यामुळे पाणी जाण्यास मार्गच नाही. त्यामुळे भुयारी मार्ग पावसाळ्याच्या दिवसात बंदच राहतो. या भुयारी मार्गाखालून जामगव्हाण, पिंपळदरी, आमदरी, राजदरी, कंजारा, औंढा नागनाथ आदी ठिकाणचे वाहनचालक व पादचारी उपयोग करतात. संबंधित विभागाने या बाबीची दखल घेऊन पावसाचे पाणी जाण्यासाठी नाली व्यवस्थितरीत्या बांधावी, अशी मागणी वाहनचालक तसेच ग्रामस्थांनी केली आहे.