आखाडा बाळापूर ( हिंगोली): बेलथर येथे आयोजित दोन बालविवाह रोकण्यात बालविवाह प्रतिबंधक समिती व बाळापूर पोलिसांना आज सकाळी यश आले. एकाच मांडवात बहिण-भावाचे लग्न लावण्यात येते. यातील दोन्ही वधू व एक वर अल्पवयीन असल्याचे पुढे आले आहे. समिती व पोलिस गावात पोहोचताच वधू-वरांचे नातेवाईक आणि वऱ्हाडी शेतामधून फरार झाले.
या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे दोन बालविवाह आज सकाळी आयोजित केले होते. सख्या बहिण भावाचे लग्न आयोजित केले होते. बहिणीचे लग्न कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील एका तरुणासोबत आयोजिले होते. तर भावासाठी अर्धापूर येथील एक अल्पवयीन मुलगी वधू म्हणून निवडली होती. आपापसातील नातेवाईक असलेल्या या सर्वांनी एकत्रित बसून लग्न ठरवले होते. परंतु एका मुलीचे वय 14 वर्ष 5 महीने, दुसऱ्या मुलीचे 15 वर्षे 9 महिने वय, तर एका नवरदेवाचेही वय देखील 17 वर्ष 9 महिने आहे.
जिल्हा प्रशासनाला या बालविवाहांची माहिती मिळाली. त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकारी अनुराधा पंडित - कांबळे व त्यांचे पथक बाळापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार पंढरी चव्हाण, मुलगीर यांच्या पथकासह गावात पोहोचले. पोलीस येत असल्याची खबर वऱ्हाडी मंडळी आणि ग्रामस्थांना लागल्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. वधू-वरांचे आई-वडील शेतातून मार्ग काढत पळून गेले. तर अनेक व-हाडी मंडळीही मिळेल त्या वाटेने घटनास्थळावरून परागंदा झाले.