हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील महालिंगी येथे एका अल्पवयीन मुलीचा १२ जुलै रोजी बालविवाह लावून दिला जात असल्याची तक्रार चाईल्ड लाईनला प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी चाईल्ड लाईन यांच्या मदतीने हा बालविवाह थांबविला.
लॉकडाऊनच्या काळात लगीनसराईला वेग आला आहे. कळमनुरी तालुक्यातील महालिंगी गावात बाल विवाहाचे नियोजन करण्यात आले होते. बालविवाह होत असल्याची चाहुल लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, जरीब खान पठाण, ड. अनुराधा पंडित, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप कोल्हे, राजरत्न पाईकराव व विकास लोणकर, पो.कॉन्स्टेबल अमोल अडकिने यांनी महालिंगी गावातील ग्रामसेवक शेख शैनोद्दिन, सरपंच राठोड, पोलीस पाटील, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडी ताई यांच्यासह मुलीच्या आई व मामा यांची भेट घेतली. तसेच बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून या गुन्ह्याकरीता १ लाख रुपये दंड व २ वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते असे समुपदेशन केले. तसेच बाल विवाहाच्या दुष्परिणाम याविषयी देखील समुपदेशन करण्यात आले. यावेळी ग्राम बाल संरक्षण समितीसमक्ष लेखी जबाब लिहून घेत बालविवाह रोखण्यात आला.