हिंगोली : जिल्ह्यातील काँग्रेसचा वाद काही संपता संपत नसून गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगर येथे १० ऑक्टोबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतही आला. चक्क प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढ्यातच हा वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद दोनच दिवसांपूर्वी येथील एका बैठकीत उफाळला होता. छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत तर त्याला तडका बसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मराठवाड्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतही काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बैठकांना बोलावतच नसल्याची तक्रार पुन्हा समोर आली. तर आढावा घेतानाही अनेक उपक्रम पूर्ण झाले नसल्याने प्रदेशाध्यक्षांनी गटातटावरून कान टोचले. तर ज्यांनी यापूर्वी बैठकांमध्ये वादंग केले, प्रभारींना मारहाण केली, ज्यांना पक्षातून काढून टाकले ते बैठकीला कसे, असा सवाल दुसऱ्या गटाने केला. यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच पेचात पडले. दोनदा वाद झाला, तिसऱ्यांदा झाल्यास खपवून घेणार नाही, थेट कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तर जिल्ह्याचे काम दोन महिन्यांत सुधारण्याची संधी आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चला, असे जिल्हाध्यक्षांना सूचित केले. तर जे सोबत येत नाहीत, त्यांचा अहवाल देण्यासही सांगितले.
लोकसभेवरूनही वादहा वाद मिटत नाही तोच हिंगोली लोकसभेसाठी जिल्ह्यातीलच उमेदवार देण्याची मागणी केल्यावरून पुन्हा वातावरण गंभीर झाले. एका नेत्यांनी इतर जिल्ह्यातील मतदान तुम्हाला पाहिजे नाही का? जर तुमच्यात एकजूट नसेल, जिल्हावाद कराल तर ठाकरे गट ही जागा मागत आहे. आता राष्ट्रवादीही आग्रही होत चालल्याचे सांगून धोका लक्षात घेण्यास सांगितले. तरीही हिंगोलीबाहेरचाच उमेदवार आमच्यावर कायम थोपवला जात असून त्याचा फटका बसत असल्याचे मत या कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आले. विशेष म्हणजे इच्छुकांपैकी बहुतेक जिल्ह्याबाहेरील आहेत.
थोरातांच्या पक्षप्रवेशाला पुन्हा ब्रेकप्रकाश थोरात यांनी या सभागृहात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रवेशावरून पुन्हा एकदा गदारोळ झाला. या गोरेगावकर गटातील काहींनी आम्ही पक्ष सोडणार असल्याचे म्हटले. त्यामुळे थोरात यांच्या पक्ष प्रवेशाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. तर यावेळी घोषणांचा मोठा गोंधळही झाला. सातव व गोरेगावकर गटातील वाद संपुष्टात आला नसताना हा नवा गोंधळ उभा राहिला आहे.