हिंगोली : कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट लहान बालकांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आल्याने ही संभाव्य लाट रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिल्या.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष आखरे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य समिती सदस्या रत्नाबाई खंदारे, यशोदा दराडे, चंद्रभागा जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत पुढे बोलताना आखरे म्हणाले की, ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवावा. त्यासाठी प्रचार, प्रसार करावा. तसेच लसीकरणासाठी आवश्यक कर्मचारी संख्या, शीत साखळी संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक शीतगृह पुरविण्यासाठी नियोजन करावे, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णास त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व आरोग्यविषयक जनजागृती होण्यासाठी त्यांच्यासाठी मल्टिव्हिटॅमीन, झिंक टॅब्लेट व व्हिटॅमीन सीच्या टॅब्लेट पुढील काही काळासाठी नियमित देण्यात याव्यात. यासाठी निधी राखीव ठेवा. वरील बाबीची जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना आखरे यांनी दिल्या.