हिंगोली : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी टोळीने गंभीर गुन्हे करणाऱ्या ४ जणांना २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी नुकतेच काढले आहेत. विशेष म्हणजे या चारही जणांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. मात्र, विभागीय आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांचे आदेश कायम ठेवले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे हद्दीत टोळीने गंभीर गुन्हे करणाऱ्या शेख माजीद शेख इस्माईल (वय २६), शेख जावेद शेख इस्माईल, (३०), शेख आमेर शेख युसूफ (२५), उवेश आयूबखाँ पठाण (२१, सर्व रा. रेल्वे स्टेशन रोड, तोफखाना हिंगोली) या चार जणांच्या जिल्हा हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्यानुसाार २ जूनला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी चारही जणांना दोन वर्षांकरीता हद्दपार केल्याचे आदेश काढले होते. मात्र, चारही जणांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांचे आदेश कायम ठेवले. त्यानुसार चारही जणांना हद्दपारीचे आदेश बजावून तत्काळ जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर काढून देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार चारही जणांना हद्दपार करण्यात आले. ही कार्यवाही करण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, प्रकाश कांबळे, पोह विलास सोनवणे, पोना राजूसिंग ठाकूर यांनी मदत केली.
दरम्यान, यापूर्वीच वसमत शहर व हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील १६ जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. यापुढेही टोळीने गुन्हे करणाऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सांगितले.