हिंगोली जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात काढणीत असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. त्यातच अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचा उताराही चांगला आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची आस होती. शासनानेही अतिवृष्टीग्रस्तांना मदत घोषित केली होती. यंदा पीकविम्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व कृषी विभागही आग्रही होता. शेतकऱ्यांच्या बाजूने ही सर्व मंडळी उभी राहिल्याचे पहायला मिळाले. त्याचबरोबर पीक कापणीचे वस्तूनिष्ठ प्रयोगही करण्यात आले. त्यात आढळून आलेल्या परिस्थितीमुळे विमा कंपनीला १.२१ लाख शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा लागला. मागील अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शेतकरी, राज्य शासन, केंद्र शासन या तिघांनी मिळून भरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळाली आहे. एचडीएफसी कंपनीकडे हिंगोली जिल्ह्याच्या पीकविम्याची जबाबदारी होती. मागील काही दिवसांपासून टप्प्या टप्प्याने पीकविमा जमा होत असून आतापर्यंत ६५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. उर्वरित रक्कमेसाठी प्रक्रिया सुरू आहे. कृषी विभागाकडून त्याचा आढावा घेतला जात आहे.
एकूण मंजूर पीकविमा १०५.१९ कोटी
प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम १३.१८ कोटी
राज्य सरकारने भरलेली रक्कम ४०.६० कोटी
केंद्र सरकारने भरलेली रक्कम ४०.६० कोटी,
विमा काढणारे शेतकरी ३.०२ लाख
लाभार्थी शेतकरी १.२१ लाख
किती जणांना मिळाला विमा ७० हजार
आतापर्यंत वाटप केलेली रक्कम ६५ कोटी
खरीप हंगाम २०२०-२१
पीकविमा लागवड क्षेत्र
१,४७,००० हेक्टर
एकूण पीकाचे क्षेत्र
३,४०.००० हेक्टर
बहुतांश शेतकऱ्यांना लाभ
पीकविम्याचा लाभ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला आहे अथवा मिळत आहे. यातून सुटलेल्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत खुप कमी आहे. पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख दिसत असली तरीही अनेक शेतकऱ्यांनी तीन तीन पिकांचा विमा भरलेला आहे. त्यामुळे शेतकरी संख्या वाढली आहे. यातील काही पिकांना फटका बसला नाही, त्यामुळे विम्याचाही प्रश्न उरला नाही. तरीही यंदा अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाल्याने त्या प्रमाणात तक्रारी दिसत नाहीत. शिवाय अजूनही विमा मंजूर होणे चालू असून शेतकऱ्यांचा खात्यावर रक्कम जमा होणे चालू आहे. याबाबत मात्र अनेक शेतकऱ्यांची नाराजी आहे. विम्याची रक्कम मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तर बियाणे खरेदी करता येईल
पीकविमा गावातील बहुतांश शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे. जर शेतकऱ्यांना ही रक्कम पेरणीपूर्वी मिळाली तर बियाणे व खते खरेदी करण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यातच आतापर्यंत केवळ ६५ कोटी रुपये खात्यावर जमा झालेले आहेत. आणखी ४० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली त्यांनाही ती बँकेतून काढण्यास अडचणी येत आहेत.