औंढा नागनाथ : उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्त युवकाचा चार दिवसांनंतर शौचालयात मृतदेहच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील मालेगाव येथून शेळय़ा-मेंढय़ा घेऊन हैदराबादकडे व्रिकीसाठी एम. एच. 0५ - ७३८ या टेम्पोने जात असताना त्याला औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाटा येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता अपघात झाला होता. यामध्ये चालकासोबत असलेला मजूरदार अकबर शहा सलीम शहा (वय २७, रा. मालेगाव, जि. धुळे) याच्यासह तिघे जखमी झाले होते. दरम्यान, त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना किरकोळ मार असल्याने येथेच उपचार झाले. दुसर्या दिवशी अकबरने मुख्य प्रवेशद्वारातच प्रात:विधी उरकल्याने गोंधळ झाला होता. त्यानंतर तो तेथून निघून गेल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र मयाताचे वडील व नातेवाईक रुग्णालय परिसरातच तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. २६ जानेवारी रोजी आरोग्यसेवक गणेश चव्हाण यांनी एका बंद शौचालयातून दुर्गंधी येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी हरिष दराडे यांना सांगितले. त्यांनी दरवाजा उघडला तर आत कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळले. याबाबत पोनि लक्ष्मण केंद्रे यांना माहिती दिल्यानंतर पोलिस कर्मचारी शंकर इंगोले, भीमराव चिंतारे, काशीनाथ शिंदे आदींनी पंचनामा केला. हे प्रेत अबकरचेच असल्याची खात्री त्याच्या नातेवाईकांनी केली. तर बंद शौचालयात त्याचे प्रेत कसे काय? असा सवाल केला. त्याचा शोध लावण्याची मागणी जिल्हा शल्यचिकीत्सक हेमंतकुमार बोरसे यांच्याकडे केली. तर औंढय़ात शवचिवच्छेदन करण्यापूर्वी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करीत संतप्त जमावाने तक्रारही दिली. त्यानंतर नांदेड येथे इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाईल, असे बोरसे यांनी सांगितले. याबाबत मयताच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नाही. मात्र डॉ. दराडे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. /(वार्ताहर)