लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांमध्ये आधी शिक्षण विभागाकडून योग्य छाननी झाली नसल्याचा परिणाम म्हणून की काय, नंतर विविध प्रमाणपत्रांवरून तक्रारी झाल्या. आता १0 जुलैला यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ टप्प्यांमध्ये शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. जवळपास अडीच हजार बदलीपात्र शिक्षक होते. त्यापैकी १४00 ते १५00 शिक्षकांच्या बदल्या झाल्याचा अंदाज आहे. यातील संवर्ग १ व २ मध्ये विविध प्रमाणपत्रांचा आधार घेवून शिरकाव केल्याच्या अनेक तक्रारी शिक्षकांतूनच होत्या. त्याची तपासणी शिक्षण विभागाकडून होत आहे. संवर्ग १ मध्ये विधवा, परित्यक्ता, कुमारिका, दिव्यांग व ५३ वर्षांवरील शिक्षकांचा समावेश आहे. तर संवर्ग २ मध्ये गंभीर आजारी, दुर्धर आजार आदींचा समावेश आहे. संवर्ग-३, ४ पर्यंत ही साखळी चालत आली होती. याशिवाय काहींनी तर पती खाजगी सेवेत असतानाही त्याची माहिती जोडून पती-पत्नी एकत्रिकरणाचा लाभ घेतल्याचीही बोंब होती. एकूण ४00 च्या आसपास शिक्षकांनी अशी प्रमाणपत्रे जोडली होती. यात काही बाबतीत संदिग्धता वाटत असल्याने अशा २00 ते २५0 शिक्षकांना १0 जुलै रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सुनावणीस पाचारण केले आहे. ते या समितीचे अध्यक्ष असून यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, परिवहन महामंडळाचा अधिकारी, बांधकामचे कार्यकारी अभियंता, शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती सर्व कागदपत्रांची छाननी करणार आहे. यात बोगस प्रमाणपत्र सादर करणाºयांची प्रकरणे वेगळी काढण्यात येणार आहेत. त्यावर पुन्हा अपात्रतेचा निर्णय घेतला जाण्याची भीती आहे. ज्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रांचा लाभ घेतला, अशांवर आता नेमकी काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे. तूर्त तरी या प्रकाराची एकच चर्चा होत आहे. पडताळणीत अडकणार नाही, यासाठीही काहीजण प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रशासन थारा लागू देत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये थेट जि.प.त तक्रारीच झालेल्या आहेत. त्यामुळे अशांना तर कोणत्याही परिस्थितीत वाचविणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.बदलीची प्रक्रिया आॅनलाईन असल्याने प्रमाणपत्रांची पडताळणी होणारच नाही, असा समज करून घेतलेल्या काहींनी असे धाडस केल्याची चर्चा रंगत आहे. तर यापूर्वी केलेली पडताळणी जुजबी असल्याने त्याचा फायदा लाटला गेल्याचे सांगितले जाते.
संदिग्ध प्रमाणपत्रांची तपासणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 12:05 AM