शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा परिसरातील अनेक गावागावांत ग्रा. पं. निवडणूक हाेत आहे. कडाक्याच्या थंडीतही गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. निवडणुकीच्या या धामधुमीत थर्टीफर्स्ट आल्याने या संधीचा अनेकांनी चांगलाच फायदा घेतला. ग्रा.पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात तुमची चर्चा, आपलेच पॅनल येणार म्हणत आता होऊ द्या खर्च म्हणत शेतात-मळ्यात गावालगत ओल्या पार्ट्या चांगल्या रंगल्या असल्याचे दिसून आले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे गावागावांतील राजकीय वातावरण तापले आहे. ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी तहसील परिसरात जत्रेचे स्वरूप आले. निवडणुकीच्या धामधुमीत थर्टीफर्स्ट आल्याने निवडणुकीला चांगलाच रंग आला. साहेब....मालक ! म्हणत गावात तुमचीच चर्चा आहे. त्यामुळे आपलं पूर्ण पॅनल निवडून येणार. आपण कसे निवडून येतो, असे थर्टीफर्स्टच्या पार्टीत पॅनल प्रमुखांना पद्धतशीर पटवून सांगत आहेत. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने कार्यकर्ते गुलाबी थंडीत शेतात ओल्या पार्ट्यावर ताव मारताना दिसले. तसेच काही जणांनी ‘आजच गुरुवार यायचा होता काय’, अशी नाराजी व्यक्त केली.