हिंगोली : केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर ॲप विकसित केले असून, यात अंगणवाडी सेविकांना दररोज महिती भरणे बंधनकारक केले आहे. मात्र, मोबाइलमध्ये हे ॲप डाऊनलोड होत नाही. त्यात सर्व माहिती इंग्रजी भाषेत भरावी लागत आहे. अनेक अंगणवाडी सेविकांचे शिक्षण सातवी ते दहावीपर्यंतच असल्याने इंग्रजीमध्ये माहिती भरताना त्यांच्या अडचणीत भर पडत आहे. राज्य शासनाने मराठीत कॅश ॲप उपलब्ध करून दिले होते. हे ॲप बंद करून पोषण ट्रॅकर ॲप सुरू केले. त्यामुळे एकतर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सुधारणा करून मराठी भाषेचा पर्याय द्यावा, अथवा हे ॲपच बंद करावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
पोषण ट्रॅकर ॲपसंदर्भात प्रशिक्षण दिले
अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपची माहिती व्हावी, त्यांना त्यात माहिती भरता यावी, यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रशिक्षणही दिले आहे; परंतु बहुतांश अंगणवाडी सेविकांचे शिक्षण कमी असल्याने इंग्रजीतून माहिती भरताना त्यांना अडचण येत आहे.
मोबाइलची अडचण वेगळीच
शासनाने सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाइल उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या मोबाइलची साठवण क्षमता व स्पीडबाबत तक्रारी आहेत. या मोबाइलमध्ये पोषण ट्रॅकर हे ॲप डाऊनलोड होत नाही. त्यात आता मोबाइल देऊन तीन ते चार वर्षे झाली आहेत. दुरुस्तीसाठी कमीत कमी दोन हजार ते जास्तीत जास्त ८ हजारांपर्यंत खर्च येत आहे. हा खर्च अंगणवाडी सेविकांनाच करावा लागत आहे. त्यामुळे स्वत:च्या मोबाइलमध्ये ॲप डाऊनलोड करून माहिती भरावी लागत आहे.
पोषण ट्रॅकरवरील कामे
पोषण ट्रॅकरमध्ये नवजात बालकापासून ते ४ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांची माहिती, गरोदर माता, स्तनदा माता यांची माहिती, त्यांना दिला जाणारा पोषण आहार आदींची माहिती नियमित भरावी लागत आहे. ही सर्व माहिती इंग्रजी भाषेत भरावी लागत आहे. त्यात डिलीटचा पर्याय नाही. वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम किंवा द्यावयाच्या सेवांबाबत कोणतेही मार्गदर्शन न येणे, माहिती भरण्याची पद्धत अतिशय किचकट असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सर्व माहिती इंग्रजीमध्ये भरावी लागत आहे. बहुतांश अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषेचे तेवढे ज्ञाने नसल्याने माहिती भरताना अडचण येत आहे, तसेच शासनाने दिलेले मोबाइलही नादुरुस्त होत आहेत. ॲपमध्ये मराठी भाषा उपलब्ध करून द्यावी.
-उषाताई वाठोरे, अंगणवाडी सेविका
केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर ॲप हा सदोष आहे. इंग्रजी न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रयस्थांच्या मदतीने माहिती भरावी लागत आहे. ॲपमध्ये मराठी भाषा उपलब्ध करून द्यावी, त्यातील त्रुटी दूर कराव्यात; अथवा ॲपच रद्द करावे आदी मागण्या शासनाकडे म.रा. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने केल्या आहेत. याकडे दुर्लक्ष झाल्यास १७ ऑगस्टपासून मोबाइल परत करून आंदोलन करण्यात येणार आहे.
-भगवानराव देशमुख, प्रदेशाध्यक्ष म.रा. अंगणवाडी सेविका, मदतणीस महासंघ
जिल्ह्यातील अंगणवाड्या - १०९५
एकूण अंगणवाडी सेविका - १०५८