लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाकडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्काराचे यंदा वितरणच करण्यात आले नाही. त्यामुळे जि. प. प्रशासनास पुरस्कार वितरणाचा विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय शिक्षण विभागातही याबाबत चर्चा होत आहे.शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो. यांवर्षी मात्र डिसेंबर महिन्यातही पुरस्कार वितरणाचे नियोजन नाही. विशेष म्हणजे याचे कारणही गुलदस्त्यात आहे. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त होते. आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर शिक्षकदिनी देणे शासन निर्णयानुसार आवश्यक आहे. मात्र नियोजनाअभावी तीन महिने उलटूनही आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अद्याप पार पडला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वेळोवेळी पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला जात असल्याने हा सोहळा कधी पार पडणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नियोजनाअभावी दरवर्षीच पुरस्कार सोहळ्याचे नियोजन बारगळते. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पुरस्कार वितरणाबाबत दरवर्षी नियोजन केले जात नाही. त्यात बैठकही लवकर होत नाही. या विविध कारणांमुळे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडतो. यंदाही गतवर्षीचे चित्र आहे.औरंगाबाद येथून प्रस्तावांना मान्यता मिळताच आदर्श पिढी घडविणाºया व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येणार असून तसे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव दिवाळीपुर्वीच औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत. सदर प्रस्तांवांना मान्यता मिळताच आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी लोकमत शी बोलताना दिली. शिवाय पुरस्कार वितरण संदर्भात औरंगाबाद येथील विभागाकडे चार दिवसांपुर्वी बोलणेही झाल्याची माहिती सोनटक्के यांनी दिली. त्यामुळे आता मान्यता मिळाल्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडण्याचे संकेत आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आलेल्या प्रस्तांना मंजूरी मिळताच पुरस्कार वितरणाची तारिख ठरविली जाणार आहे. त्यानंतर वितरण सोहळ्याचे नियोजन केले जाईल.
शिक्षक पुरस्कार वितरणाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:29 AM